ब्रिटनमधील ४० हजार लोकांवर चिनी कंपनीची हेरगिरी, ‘द टेलीग्राफ’चा दावा

नवी दिल्ली, १४ सप्टेंबर २०२०: चीनच्या निकृष्ट हेतूनं केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग त्रस्त आहे. सोमवारी सकाळी हे उघड झालं की चीन दहा हजार लोकांवर लक्ष ठेवून आहे ज्यामध्ये देशाच्या पंतप्रधान पासून ते राष्ट्रपती पर्यंत सर्वांचाच समावेश आहे. आता असाच एक खुलासा ब्रिटनच्या बाबतीत देखील समोर आलाय. ज्यात एका चीनी कंपनीनं ब्रिटनमधील ४० हजार लोकांवर नजर ठेवलीय.

ब्रिटीश वृत्तपत्र द टेलीग्राफनं आपल्या अहवालात असं लिहिलं आहे की, एका चिनी कंपनीनं सुमारे ४०,००० ब्रिटीश लोकांचा डेटाबेस तयार केला आहे, जो चीन सरकार त्याच्या गुप्तचर सेवेसाठी वापरत आहे.

अहवालानुसार या कंपनीनं मोठे ब्रिटिश राजकारणी, व्यापारी, अभिनेते यांचा डेटा तयार केला आहे. या सर्व लोकांचं एक फोल्डर चिनी सर्व्हरमध्ये तयार केलं गेेलं आहे, ज्यामध्ये या सर्व लोकांची माहिती ठेवली गेलीय.

टेलीग्राफच्या दाव्यानुसार, चिनी कंपनीनं ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन आणि त्यांचे मंत्रिमंडळ, राजघराण्याचे कुटुंब, सैन्य अधिकारी, व्यापारी आणि बरेच गुन्हेगार यांचा डेटाबेस तयार केला आहे. या यादीमध्ये आणखी बरीच नावं आहेत परंतु, अद्याप चीननं त्यांचा डेटा कसा गोळा केला आणि केव्हापासून ते करत आहेत हे उघड झालं नाही.

या खुलाशावर ब्रिटीश खासदार जस्टिन वेल्बी, एफ्राइम मिरविस यांनी सरकारला प्रश्न विचारत म्हंटलं आहे की संपूर्ण ब्रिटन चीनच्या नजरेत असल्याचं दिसत आहे.

भारतातही याचा खुलासा झालाय. सोमवारी भारतातील एका इंग्रजी वृत्तपत्रानंही याचा खुलासा केलाय. ज्यामध्ये असा दावा केला गेला होता की, एका चिनी कंपनीनं पंतप्रधान, राष्ट्रपती, कॅबिनेट मंत्री, डझनभर मुख्यमंत्री, माजी लष्करप्रमुख, न्यायाधीश, बॉलिवूड स्टार आणि खेळाडूंचा समावेश असलेल्या दहा हजार लोकांची हेरगिरी केली.

हा खुलासा झाल्यानंतर अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत असून हा मुद्दा लोकसभेतही उपस्थित झाला होता. या सेलिब्रेटींचा डिजिटल डेटा चीनी कंपनीनं तयार केला असून ती चिनी सैन्याच्या पीएलएबरोबर सामायिक केली गेली आहे.

भारत सरकारनं यापूर्वीही बरीच चिनी कंपन्या आणि मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे, ज्यांच्यावर असा डेटा संकलित केल्याचा संशय होता. असं असूनही मोठ्या प्रमाणात चिनी कट रचले जात आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा