पुणे, ९ मार्च २०२३ : राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला. यामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला होता; परंतु आता उकाडा पुन्हा वाढणार आहे. राज्यातील तापमान ४ ते ६ अंश सेल्सिअसने वाढण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. गुरुवारी (ता. ९ मार्च) कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील काही भागांत उष्माघाताचा इशारा दिला आहे.
फेब्रुवारी महिन्यातच तापमानात प्रचंड वाढ झाली होती. अंगाची लाहीलाही होत असतानाच ता. ५ ते ८ मार्चदरम्यान राज्यभरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला. यामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला; परंतु पिकांचे मोठे नुकसान झाले. आता पुन्हा एकदा उकाडा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील कमाल तापमानात मोठी वाढ दिसणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे, तर दुसरीकडे विदर्भात मात्र काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
यावर्षी राज्यातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. मार्च ते मे महिन्यादरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून जाहीर केली आहे. मागील काही वर्षांत तापमानात होत असलेली वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात पारा चाळीशीजवळ पोचला होता. फेब्रुवारी महिना हा गेल्या १४७ वर्षांतला सर्वात उष्ण महिना ठरला. उर्वरित तीन महिनेदेखील असेच तापदायक राहतील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील












































