ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे, १० जानेवारी २०२३ : ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे (वय ७८) यांचे आज मंगळवारी (ता. १०) पहाटे पुण्यात निधन झालं. ते ब्रेनट्यूमर आजाराने ग्रस्त होते शुक्रवार पेठ येथे मुलीच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

रंगभूषाकार म्हणून त्यांची सुमारे ५५ वर्षांची कारकीर्द होती. महाराष्ट्रातील सर्व नावाजलेल्या नाट्य स्पर्धांशी ते रंगभूषाकार म्हणून संबंधित होते. मुखवटे तयार करण्यात त्यांचा हातखंडा होता. रं’गभूषा’ नावाचे पुस्तक त्यांनी लिहिले असून पु.ल. देशपांडे यांच्या हस्ते त्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. या पुस्तकाला राज्य सरकारचा त्या वर्षीचा उत्तम साहित्यकृतीचा पुरस्कारही मिळाला होता.

तरुण कलावंतांमध्ये रंगभूमीवरील ‘भावेकाका’ अशी ओळख असलेले प्रभाकर भावे सलग अनेक वर्षे पुरुषोत्तम स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची रंगभूषा करीत होते. मूळचे साताऱ्याचे असलेल्या भावेकाकांना लहानपणापासून नाटक, संगीत, साहित्याची आवड होती; परंतू साताऱ्यामध्ये त्यांच्या कलेला पुरेसा वाव नसल्याने ते पुण्यात आले आणि इथेच रमले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा