माढा, १२ ऑगस्ट २०२०: माढा तालुक्यातील शिंदेवाडी येथील ग्रामस्थांनी व काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांनी खड्डे बुजवून आंदोलन केले. माढा तालुक्यातील जाधववाडी ते शिंदेवाडी या रस्त्यावर पडलेले खड्डे अनेक दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाला अर्ज, विनंत्या करून देखील बुजवले नव्हते. वेळोवेळी रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासनाला अर्ज, विनंत्या करून देखील दखल घेतली जात नव्हती, यामुळे हे आंदोलन करण्यात आले.
अशातच पावसाळा सुरू झाला आहे आणि खड्ड्यामधे पाणी साचले आहे. खड्डा किती खोल आहे याचा अंदाज येत नव्हता यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. तालुक्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी श्रमदान करून हे खड्डे बुजवले अशा प्रकारचे सामाजिक सुधारणाच्या माध्यमातून देखील आंदोलने करता येते हे ग्रामस्थांनी व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिले आहे. जाधववाडी व सापटणे या दोन गावांना जोडणारा शिंदेवाडी हा एकमेव रस्ता आहे मागील २० वर्षांपासून या रस्त्याची एकदाही डागडुजी देखील झाली नाही.
या आंदोलनामध्ये जहीर मनीर, शाहू जगताप, तुकाराम देवकुळे, माढा तालुका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अनिल गवळी, उजनीचे उपसरपंच कालिदास शिरतोडे व ग्रामस्थ आदींनी सहभाग घेतला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रदीप पाटील