कोल्हापूर, २१ सप्टेंबर २०२०: देशाच्या दोन्ही सभागृहांमध्ये केंद्र सरकारनं सादर केलेलं ”कृषी विधेयक” मंजूर झालं. मात्र या विधेयकाला अनेक शेतकरी संघटनांनी विरोध केलायं. महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील सरकारच्या कृषी विधेयकाला तीव्र विरोध केला असून हे विधेयक राज्यात कसे लागू होते हे पाहतो असं म्हणत संताप व्यक्त केलायं.
राजू शेट्टी नेमकं काय म्हणाले?
कृषी विधेयकाचा निषेध करत त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात ते म्हणालेत कि, ”पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही कायदा कराल ! पण लक्षात ठेवा सध्याच्या युगात बळीला पाताळात गाडणे एवढे सोपे नाही आमच्या हातात दगड आहेत व तुमच्या काचा आहेत. भलेही तुम्ही कटकारस्थान करुन आणि इतर राजकीय पक्षांच्या सहकाऱ्याने शेतकऱ्याला कॉर्पोरेट सेक्टरच्या घशात घातलं. त्याला शहरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हमीभाव हा शेतकऱ्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. तो जर काढून घेण्याचा प्रयत्न केला तर एक दिवस या देशातील करोडो शेतकऱ्यांची पोरं हातात दगड घेतील. या दगडांमध्ये तुमच्या काचा शिल्लक राहणार नाहीत हे लक्षात ठेवा”.
दरम्यान संसदेत या विधेयकावरून बराच गोंधळ झाला होता. विरोधी बाकावरील आठ खासदारांना सध्या निलंबित करण्यात आलंय. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सभागृहात अनुपस्थित न राहून सरकारची मदत केलीय का? असाही प्रश्न विचारला जातोय. त्यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टीका होत असून त्याचंही राजकारण होऊ लागलंय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे.