शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमागे ‘ही’ आहेत दोन कारणे

मुंबई, २२ डिसेंबर २०२०: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारांमध्ये सातत्याने वाढ होत होती. मात्र काल एका दिवसात शेअर बाजार मोठ्या संख्येने घसरला. सोमवारी सुरुवातीच्या सत्रात बाजार काही प्रमाणात खाली घसरला होता. निफ्टी निर्देशांक २५-३० अंकाने सुरुवातीच्या सत्रात घसरला होता तर सेन्सेक्स ५० ते १०० अंकांची घसरण दाखवत होता. सोमवारच्या सत्रातील अखेरीस सेन्सेक्स १४०६ अंकांनी घसरून ४५,५५३.९६ वर बंद झाला. तर निफ्टी निर्देशांक ४३२.१५ अंकांनी घसरून १३,३२८.४० अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी १२५८ अंकांनी घसरून २९,४५६ अंकांवर बंद झाला.

खरं तर, सेन्सेक्स सोमवारी २८ अंकांनी खाली ४६,९३२ वर उघडला. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी १९ अंकांनी घसरून १३,७४१ वर खुला झाला. दुपार १२ नंतर घसरणीचा कल असा सुरु झाला की सेन्सेक्स २०३७ अंकांवर घसरला आणि ४४,९२३.०८ च्या पातळीवर पोहोचला.

मार्केट बंद होईपर्यंत सर्वत्र फक्त लाल निशाणे होती. सेन्सेक्सच्या सर्व ३० समभागात विक्री झाली. निफ्टीच्या सर्व ५० समभागात विक्री. बँक निफ्टीचे सर्व १२ समभाग कोसळले. सलग ६ दिवस विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर भारतीय शेअर बाजारामध्ये हा मंदीचा दिवस पाहण्यास मिळाला. या घट मागील दोन महत्त्वाची कारणे सांगितली जात आहेत.

पहिले कारण :-

शेअर बाजाराच्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अचानक कोरोनाची वाढ झाल्याने तसेच नवीन कोरोना पसरत असल्याने इतकी मोठी घसरण झाली. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी ब्रिटनमधील कोरोनाच्या वेगवान वाढत्या संक्रमणामुळे लंडनसह अनेक ठिकाणी लॉकडाऊन जाहीर केले.

इंग्लंडच्या काही भागात, कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार समोर आला आहे, जो झपाट्याने पसरत आहे. ज्यामुळे बर्‍याच देशांनी ब्रिटनच्या प्रवासावर बंदी घातली आहे. थायलंडमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग अचानक वाढला आहे. यापैकी बहुतेक संक्रमण थायलंडच्या सर्वात मोठ्या सीफूड बाजाराशी संबंधित आहेत.

दुसरे कारण :-

गेल्या दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणात परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकीची (एफपीआय) भारतीय शेअर बाजारामध्ये गुंतवणूक झाली. भारतीय बाजारात डिसेंबरच्या पहिल्या १८ दिवसांत एफपीआयने ५४ हजार ९८० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, पण आता ते वेगाने गुंतवणूक काढून घेत आहेत.

अचानक एफपीआयची विक्री झाल्याने शेअर बाजाराला सावरता आले नाही. ख्रिसमस आणि नवीन वर्षामुळे विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढून घेत आहेत. त्याच बरोबर, तज्ञ असे म्हणत आहेत की, बाजारात विक्रमी तेजी झाल्यानंतर नफा बुकिंग नक्कीच होईल, परंतु बाजारात इतक्या वेगाने घसरण होणे अपेक्षित नव्हते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा