तुळजापूर, १९ ऑक्टोबर २०२०: यावर्षीही पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खास करून गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. याचा आढावा घेण्यासाठी कालपासून शरद पवार मराठवाड्याच्या दौर्यावर निघाले आहेत. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी तुळजापूर पासून केली. यानंतर आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटून शक्य तितके जास्त कर्ज घ्यावे, अशी विनंती करणार आहे”.
उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर सोमवारी ते तुळजापुरात प्रसारमध्यमांशी बोलत होते. “या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त होतं त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये नुकसानीची टक्केवारीही जास्त आहे. यामध्ये उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि सोलापूरमधील काही परिसराचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही वर्षात नगदी पिकाची जागा सोयाबीनने घेतली आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन कुजला किंवा उद्ध्वस्त झाला आहे. तर काही भागांमध्ये शेतकऱ्यांनी ऊसाची लागवडही केली होती. हा ऊसदेखील अतिवृष्टीमुळे खराब झाला आहे. या भागातील कारखानदारी लवकर सुरु झाल्यास हा ऊस गाळीपासाठी लवकरात लवकर नेता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल,” असे शरद पवार यांनी सांगितले.
“नुकसान भरून काढण्यासाठी कर्ज घेण्याशिवाय पर्याय नाही. पिक विम्यासंदर्भात शिथिलता आणण्यासाठी केंद्राकडे मागणी करणार आहे. हा प्रश्न खूप मोठा आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन यावर मात करायला हवी. केंद्र व राज्य सरकार दोघांनी एकत्र येऊन मार्ग काढायला हवा” असे शरद पवार म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे