देशात ऑक्सिजन सिलेंडर्सची कोणतीही कमतरता नाही; सचिव राजेश भूषण

नवी दिल्ली, १६ सप्टेंबर २०२० : देशात ऑक्सिजन सिलेंडर्सची कोणतीही कमतरता नसल्याचं आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. देशात ऑक्सिजन सिलेंडर निर्मितीची क्षमता ६ हजार ९०० मेट्रिक टनपेक्षा अधिक आहे. प्रत्येक राज्याने ऑक्सिजन सिलेंडरचा ताळेबंद योग्य रीतीने हाताळला तर ऑक्सिजन सिलेंडर्सचा पुरवठा व्यवस्थित होईल, असंही त्यांनी नमूद केलं.

देशात तीन लशींच्या वैद्यकीय चाचण्या सुरु असून कॅडीला आणि भारत बायोटेकच्या लशीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. सिरम संस्थेच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या असून तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू होत आहेत. १४ ठिकाणी १५०० लोकांवर या चाचण्या होणार आहेत, अशी माहिती या वेळी भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत कोविड १९ चे ३८ लाख ५० हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. देशात प्रत्येक दहा लाख लोकसंख्येमागे ३ हजार ५७३ रुग्ण असून जागतिक पातळीवर हे प्रमाण दहा लाखांमागे ३ हजार ७०४ रुग्ण इतके आहे.

भारतात कोविड १९ मुळे मरण पावण्याचे प्रमाण दर दहा लाखांमागे ५८ इतकं आहे तर जागतिक पातळीवर ते ११८ इतकं आहे. देशातील एकूण कोविड १९ रुग्ण संख्येच्या ६० टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू या पाच राज्यांमध्ये आहेत. १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण रुग्ण संख्या पाच हजारांहून कमी आहे; तर केवळ चार राज्यांमधील रुग्ण संख्या ५० हजारांपेक्षा अधिक आहे. १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये रुग्ण संख्या पाच ते पन्नास हजारांच्या दरम्यान आहे, असंही राजेश भूषण यांनी स्पष्ट केलं.

देशात आत्तापर्यंत ५ कोटी ८३ लाखांपेक्षा अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून एका आठवड्यात ७६ लाखांहून अधिक चाचण्या झाल्या असल्याचं भूषण यांनी नमूद केलं. दरम्यान, गेल्या २४ तासात देशात ७९ हजार २९२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. त्यामुळे आत्तापर्यंत या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ लाख ५९ हजार ३९९ झाली असून रुग्ण बरे होण्याचा दर आणखी सुधारत ७८ पूर्णांक २८ शतांश टक्क्यांवर गेला आहे.

सध्या देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४९ लाख ३० हजार २३६ वर पोहोचली असून ९ लाख ९० हजार ६१ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. एकूण रुग्ण संख्येच्या २० टक्के रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या २० तासात एक हजार ५४ रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाला. त्यामुळे देशातील आत्तापर्यंत या आजारामुळे दगावलेल्या रुग्णांची संख्या आता ८० हजार ७७६ वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा