अजून ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही, अब्दुल सत्तार

मुंबई, २० ऑक्टोंबर २०२२: राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ नुकसान झालेले आहे. तर शेतकरी हवालदिल झाला आहे. अशात शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी असे आदेश दिले आहेत. मात्र अजून ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही, असं विधान अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार काय म्हणाले

राज्यात ओल्या दुष्काळासारखी स्थिती निर्माण झालेली नाही. पण शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे पंचनामे वस्तुनिष्ठ पद्धतीने केले जातील. आता दिवाळीच्या सुट्या लागणार आहे. एक-दोन दिवस शासकीय कर्मचारी सुटीवर असतील. पण १५ दिवसांच्या आत सरकारकडे नुकसानीचे आकडे येतील. त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल, असे सत्तार यांनी स्पष्ट केलं आहे.

दुष्काळासंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा केली जाणार का? या प्रश्नाचे थेट उत्तर देण्याचे सत्तार यांनी टाळले आहे. मंत्रीमंडळ बैठकीत काय काय बोलावे, काय नाही हे गोपनीय ठेवावे लागते. मंत्रीमंडळाचा तो अधिकार आहे. मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा होईल. त्यानंतर चर्चा तसेच घेतलेले निर्णय सार्वजनिक केले जातील, असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.

परतीचा पाऊस झाला याचं काय पहिलं वर्ष नाही. प्रत्येक वेळी तो पडतो, त्याचा अंदाज लावता येत नाही, असंही सत्तार म्हणाले. आमच्याकडे शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती येत आहे. पंचनामे झाल्यावर नुकसानीचा आकडा कळेल, त्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळेल, कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असं आश्वासन सत्तार यांनी दिलं आहे. आत्तापर्यंत सरकारने साडेपाच हजार कोटी रुपयांनी नुकसान भरपाई दिली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा