शिवसेनेच्या वादावर तोडगा नाही; आता अधिक सुनावणीची गरज : सुप्रीम कोर्ट

मुंबई, १७ फेब्रुवारी २०२३ : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सुरू असलेल्या सुनावणीत आमदारांना अपात्र ठरविण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांवरील नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी ७ सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्याबाबतचा आदेश गुरुवारी (ता.१६) सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. त्यावर शुक्रवारी (ता.१७) सकाळच्या सत्रात कोर्टाने निकाल जाहीर केला. त्यानुसार, ठाकरे गटाने हे प्रकरण ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे जावे, अशी केलेली मागणी कोर्टाने फेटाळली आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने ठाकरे गटाची ही मागणी नाकारली आहे; तसेच याप्रकरणी आता पुढील सुनावणी ता. २१ आणि ता. २२ फेब्रुवारीला होणार आहे.

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एम. आर. शाह, कृष्णा मुरारी, हिमा कोहली आणि पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी गटांनी दाखल केलेल्या खटल्यांवर हा आदेश दिला. २०२२ च्या राजकीय संकटामुळे महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाले.

सुप्रीम कोर्टाने सांगितले, की खटल्यातील तथ्यांशिवाय संदर्भाच्या मुद्द्यावर स्वतंत्रपणे निर्णय होऊ शकत नाही. केसच्या गुणवत्तेवरच संदर्भाचा मुद्दा ठरविला जाईल. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाच्या गुणवत्तेच्या आधारावर मंगळवारपासून (ता. २१) सकाळी १०:३० वाजता सुनावणी होणार आहे. घटनापीठाने बुधवारी या मुद्द्यावर आपला निर्णय राखून ठेवला होता.

खरे तर, २०१६ मध्ये नबाम रेबिया प्रकरणात ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाने असा निर्णय दिला होता, की स्पीकरच्या विरोधात त्यांना हटविण्याचा प्रस्ताव प्रलंबित असल्यास स्पीकर आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेऊ शकत नाही. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ता. २१ फेब्रुवारीला होणार आहे. या निकालानंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोरच या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपला निर्णय राखून ठेवला होता.

शिवसेनेचे तगडे नेते म्हणविले जाणारे एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी जून-जुलैमध्ये उद्धव ठाकरेंविरोधात बंडखोरी केली. यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. दोन आठवड्यांच्या राजकीय संघर्षानंतर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले, तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा