चाकण परिषदेच्या वाढीव करात दुरुस्ती होणार आहे

चाकण, ४ मार्च २०२३ : चाकण नगरपरिषदेकडून करण्यात आलेल्या करवाढीमध्ये दुरुस्ती करण्याबाबत शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी, पुणे नगररचना विभागाचे सहायक संचालक; तसेच नगरपरिषद पदाधिकारी यांच्यात शुक्रवारी बैठक पार पडली. बैठकीला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत करवाढीत तत्काळ बदल करण्याचे आश्वासन दिले आहे.

चाकण नगरपरिषद हद्दीतील मिळकतधारकांना घरपट्टी, नळपट्टीबाबत देयके देण्यात आली आहेत. येत्या ३१ मार्च अखेर ही देयके भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत; मात्र पालिकेने दिलेल्या देयकांत यंदा प्रथमच शिक्षण कर लावण्यात आला आहे. तोदेखील मोठ्या प्रमाणावर लावल्याचा आरोप मिळकतधारकांनी केला. यात दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्रात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते.

त्यावर शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पुणे नगररचना विभागाचे सहायक संचालक अभिजित केतकर यांच्याकडे माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. बैठकीत करवाढीसंदर्भात सुचविलेले बदल कमी करण्यास केतकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ बदल करण्याचे आश्वासन दिल्याचे गोरे यांनी सांगितले. शिवसेना जिल्हा संघटक अशोक भुजबळ, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, चाकणचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे आदी यावेळी उपस्थित होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा