मुंबई, ७ मे २०२१: राज्यात वाढत्या करोनामुळं आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. राज्यात आरोग्य विभागात तब्बल १६ हजार पदांवर भरती होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून देण्यात आलीय.
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, ‘राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेबाबत वर्तविलेल्या अंदाजामुळं रुग्णसेवेसाठी अधिक मनुष्यबळाची गरज आहे. सध्या रुग्णसेवेशी निगडीत ५० टक्के पदभरतीला मान्यता होती. मात्र ,वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण पाहता १०० टक्के पदभरतीला मान्यता देण्याबाबत आग्रहपूर्वक मागणी काल बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली. त्याला मान्यता देतानाच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या स्तरावर पदभरतीचा निर्णय घेण्याला मंजुरी देण्यात आलीय.
पदभरतीमध्ये गट क आणि ड संवर्गाचे १२ हजार पदे भरण्यात येतील. त्यामध्ये नर्स, तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय, वाहनचालक, शिपाई अशी पदे भरण्यात येतील. तर गट अ आणि ब मध्ये प्रत्येकी २००० पदे अशी एकूण १६ हजार पदे भरण्याची शासनस्तरावरील प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करू, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे