ही ३४ औषधं होऊ शकतात स्वस्त, Essential Medicinesच्या यादीत होणार समावेश

NLEM 2022, १४ सप्टेंबर २०२२: अत्यावश्यक प्रतिजैविक औषधांच्या किमतीबाबत सरकारने मोठा निर्णय घेतलाय. सरकार अत्यावश्यक औषधांची नवीन यादी जाहीर करणार आहे. सरकारच्या या निर्णयानंतर निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीसह पेन किलर, एंटीबायोटिक्स औषधांच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे. सरकारने मंगळवारी सांगितलं की यादीत ३४ नवीन औषधं समाविष्ट करण्यात आली आहेत आणि २६ अत्यावश्यक औषधांच्या यादीतून काढून टाकण्यात आली आहेत. तसेच यादीत समाविष्ट असलेल्या औषधांच्या किमती बदलू शकतात.

नव्या यादीत ३८४ औषधांचा समावेश

अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीमध्ये (NLEM २०२२) ३८४ औषधं आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं की, या यादीचा मसुदा तयार करणं ही एक दीर्घ प्रक्रिया आहे आणि संपूर्ण भारतातील सुमारे ३५० तज्ञांनी NLEM २०२२ चा मसुदा तयार केलाय. यासाठी त्यांनी १४० हून अधिक कंसल्टेशन मीटिंग्स घेतल्या आहेत.

अत्यावश्यक औषधांच्या नॅशनल लिस्ट मध्ये (NLEM) समाविष्ट केल्या जाणार्‍या औषधांच्या आणि उपकरणांच्या किमती नॅशनल फार्मास्युटिकल्स प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ठरवतील. त्यानंतर यादीत समाविष्ट असलेली औषधं व उपकरणं निश्चित किंमतीत बाजारात विकली जातील. या यादीत समाविष्ट नसलेल्या औषधांच्या किमती दरवर्षी १० टक्क्यांनी वाढवण्याची परवानगी आहे.

कोविड औषधं आणि लस समाविष्ट नाहीत

संसर्गविरोधी (अँटीबायोटिक्स, अँटीफंगल्स इ.), मधुमेहावर उपचार करणारी औषधं, एचआयव्ही, टीबी, गर्भनिरोधक आणि हार्मोनल औषधं NLEM २०२२ चा भाग आहेत. NLEM २०२२ च्या यादीमध्ये कोविड-१९ ची औषधं आणि लस समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. कारण ते आपत्कालीन वापर प्राधिकरण (EUA) अंतर्गत येतात. अत्यावश्यक औषधांची राष्ट्रीय यादी दर तीन वर्षांनी सुधारित केली जाते. गेल्या वेळी कोविडमुळं यादीत सुधारणा करता आली नव्हती.

किंमती कशा ठरवल्या जातात?

NLEM मध्ये समाविष्ट असलेल्या औषधांना शेड्यूल औषधं म्हणतात. NPPA घाऊक किंमत निर्देशांकाच्या आधारे या औषधांच्या किमती निश्चित करते. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, NLEM ची रचना सुरक्षा, परिणामकारकता आणि खर्च (परवडणारी) यावर करण्यात आलीय. यामध्ये फक्त त्या औषधांचा समावेश आहे, ज्यांना भारतीय नियामकाने मान्यता दिली आहे. देशातील आजारांचं ओझं आणि सध्याची उपचार प्रक्रिया लक्षात घेऊन ही नवी यादी तयार करण्यात आलीय.

दर तीन वर्षांनी यादी अपडेट केली जाते

१९९६ मध्ये, पहिल्या NLEM यादीत २७९ औषधांचा समावेश होता. ही यादी वेळोवेळी अद्ययावत करण्यात आलीय. साधारणपणे दर तीन वर्षांनी यादी सुधारित केली जाते. मात्र यावेळी सात वर्षांनंतर यादी बदलण्यात येत आहे. कोविडमुळं यादी अपडेट करता आली नाही. यापूर्वी २०१५ मध्ये NLEM यादी बदलण्यात आली होती. यावेळी २०१५ च्या यादीतून २६ औषधं काढून टाकण्यात आली असून ३४ नवीन औषधांचा यादीत समावेश करण्यात आलाय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा