या करदात्यांना आयकर मुदतीत वाढ, आता 15 मार्चपर्यंत दंड न देता भरता येणार आयटीआर

नवी दिल्ली, 12 जानेवारी 2022: आयकर विभागाने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी (आकलन वर्ष 2021-22) आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 15 मार्चपर्यंत वाढवलीय. मात्र, मुदतीत हा बदल काही करदात्यांसाठीच करण्यात आलाय. आयकर विभागाने ट्विट केले आहे की कोविड-19 आणि ऑडिट रिपोर्टच्या ई-फायलिंगमध्ये करदात्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन CBDT ने मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी ऑडिट रिपोर्ट आणि ITR दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवलीय. यासंदर्भात मंगळवारी परिपत्रक जारी करण्यात आलं.

सर्वांना दिलासा मिळणार नाही

कर आणि गुंतवणूक तज्ज्ञ बलवंत जैन यांच्या मते, हा दिलासा सर्व करदात्यांना नाही. ते म्हणाले की, ज्या करदात्यांना कंपनी कायदा, सोसायटी कायदा, एलएलपी कायदा किंवा आयकर कायद्यांतर्गत लेखापरीक्षण करणं आवश्यक आहे अशा करदात्यांना ही मुदत वाढवण्यात आलीय.

ही मुदतही वाढवली

वित्त मंत्रालयाने कर लेखापरीक्षण अहवाल (टैक्स ऑडिट रिपोर्ट) सादर करण्याची तारीख 15 जानेवारी 2022 ते 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवलीय. जैन म्हणाले की, आता ऑडिट रिपोर्ट अपलोड करण्याची अंतिम मुदत 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे आणि अशा करदात्यांना ITR भरण्याची अंतिम मुदत 15 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

सामान्य करदात्यांची ही शेवटची तारीख होती

सामान्य करदात्यांची प्राप्तिकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 रोजी संपली. यावर्षी, कोविड-19 संकटामुळं आणि आयकर विभागाने नवीन पोर्टल सुरू केल्यामुळं करदात्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा