औरंगाबाद, २६ जानेवारी २०२३ : राज्यात येत्या तीन महिन्यांत शिक्षकांची ३० हजार पदे भरली जातील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारासाठी संत एकनाथ रंगमंदिरात झालेल्या शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, सहकारमंत्री अतुल सावे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. राज्यात २०१२ पासून शिक्षक भरती बंद आहे. आम्ही ती पुन्हा सुरू करीत आहोत. येत्या तीन महिन्यांत शिक्षकांची ३० हजार पदे भरली जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, आचारसंहिता संपताच चार फेब्रुवारीपर्यंत अनुदानाचा जी.आर. काढला जाईल, अशीही घोषणा फडणवीस यांनी केली. आता आपली अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर होणार आहे. जुन्या पेन्शन योजनेबाबत आम्ही नकारात्मक नाही. याबाबत वित्त, नियोजन विभागांसह सर्वांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल. जे काही करायचे ते आम्हीच करू शकतो.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर