व्हेनेझुएला, ८ ऑक्टोबर २०२०: एकेकाळी व्हेनेझुएला हा खूप श्रीमंत देश असायचा, पण आज या देशाच्या चलनाचं मूल्य भंगाराच्या बरोबरीवर राहिलं आहे. महागाईचा दर इतका उच्च झाला आहे की एक कप कॉफी किंवा चहा साठी पिशवी भरून पैसे घेऊन जावं लागत आहेत. आता या समस्येवर मात करण्यासाठी व्हेनेझुएला सरकार पुन्हा एकदा एक मोठी नोट काढणार आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार रोकड कमतरतेमुळं व्हेनेझुएला नोट छापण्याचा कागद देखील बाहेरून मागवत आहे.
व्हेनेझुएलानं आतापर्यंत एका इटालियन कंपनीकडून ७१ टन सिक्युरिटी पेपर खरेदी केला आहे. व्हेनेझुएलाची मध्यवर्ती बँक आता १,००,००० बोलिवार ची नोट देणार आहे. ही आतापर्यंतची सर्वात चलनी नोट असेल. तथापि, एक लाख बोलिवार नोटेचं मूल्य फक्त ०.२३ असंल. म्हणजे या नोटेतून केवळ दोन किलो बटाटेच खरेदी करता येतील.
गेल्या वर्षी व्हेनेझुएलामध्ये महागाईचा दर २,४०९ टक्के होता. त्याआधीही व्हेनेझुएलाच्या सरकारनं ५०,००० बोलिवर’च्या नोटा छापल्या होत्या. आता व्हेनेझुएला आणखी मोठ्या नोटा आणण्याची तयारी करत आहे.
व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था सलग सातव्या वर्षी मंदीचा सामना करीत आहे. कोरोना महामारी आणि तेलाच्या उत्पन्नात घट झाल्यामुळं व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेचं आकारमान यावर्षी २० टक्क्यांनी घटू शकतं. चलन स्थिर करण्यासाठी सरकारनं आपल्या नोटांमधून शुन्यांची संख्या कमी केली होती, परंतु सर्व प्रयत्न अयशस्वी झाले.
व्हेनेझुएलामध्ये २०१७ पासून महागाईत सातत्यानं वाढ होत आहे. बर्याच लोकांना वस्तूही खरेदी करता येत नाहीत. संध्याकाळी दुकानांमध्ये लूटपाटसुद्धा सुरू होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे