हा देश छापणार १० लाखांची नोट, भारताच्या तुलनेत मूल्य केवळ ३६ रुपये

व्हेनेझुएला, ७ मार्च २०२१: एकेकाळी तेल विक्री च्या जोरावर आर्थिक संपन्नता भोगणाऱ्या व्हेनेझुएला देशाची स्थिती आता भयावह झाली आहे. ओढवलेल्या आर्थिक संकटामुळे तेथील सरकारला उच्च मूल्य असलेले चलन छापावे लागत आहे. परंतु, दिवसेंदिवस व्हेनेझुएलाच्या चलनाची किंमत इतर देशांच्या तुलनेत ढासळत गेली आणि आता या देशाला चक्क १० लाख रुपयांची नोट छापावी लागणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी कोणत्याही देशाने एवढ्या मोठ्या मूल्याची नोट छापलेली नाही. लक्षात घेण्यासारखे हे आहे की, या नोटेचे मूल्य १० लाख असले तरी त्याची तुलना अमेरिकन डॉलरशी केली असताना, ती केवळ अर्धा अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये केवळ ३६ रुपये एवढीच आहे.

गेल्या काही वर्षापासून व्हेनेझुएला या देशाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे. देशात कच्च्या तेलाचे मोठे साठे असताना देखील या देशावर अशी वेळ आली आहे. यापूर्वीही व्हेनेझुएलाच्या सरकारने अशा नोटा छापल्या होत्या. वर्तमानात व्हेनेझुएलामध्ये १० हजार, २० हजार आणि ५० हजार बोलिवरच्या नोटा चलनात आणल्या आहेत. व्हेनेझुएलाच्या केंद्रीय बँकेने सांगितले की, देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती पाहिल्यावर मोठ्या किंमतीच्या नोटा छापाव्या लागल्या. पुढील आठवड्यात २ लाख बोलिवर आणि ५ लाख बोलिवरच्या नोटा जारी करण्यात आल्या आहेत. भारतातील १ रुपयाची व्हेनेझुएलातील किंमत २५ हजार ५८४.६६ बोलिवर आहे.

व्हेनेझुएला सरकारने असा नोटा छापण्याचे कारण म्हणजे अगदी किरकोळ सामान घेण्यासाठी सुद्धा लोकांना मोठ्या प्रमाणावर सुट्टे पैसे म्हणजेच कमी मूल्य असलेल्या नोटा अक्षरशः पोती भरून न्यावी लागत असे. लोक जाताना पोते भरून पैसे घेऊन जात असत तर येताना केवळ एका पिशवीत मावेल एवढेच सामान घरी घेऊन येत असत. याला पर्याय म्हणून मोठे मूल्य असलेल्या नोटा छापण्याचा निर्णय सरकारने घेतला.

गेल्यावर्षीच्या ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार व्हेनेझुएला सरकार लवकरच १० लाखाची नोट छापणार असल्याचे सांगितले होते. यासाठी इटलीतील एका फर्मकडून ७१ टन सेक्युरिटी पेपरची आयात केली होती. या फर्मची मालकी इटलीच्या बॅन कॅपिटलकडे आहे. जी जगभरात अनेक देशांना सेक्युरिटी पेपरची निर्यात करते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा