प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेलं हे घर तुमच्या भविष्याचा नवा पाया आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदी

8

नवी दिल्ली, १२ सप्टेंबर २०२० : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेलं हे घर तुमच्या भविष्याचा नवा पाया आहे. या घरातून तुम्ही आपल्या आयुष्याची नव्यानं सुरुवात करा अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेच्या मध्य प्रदेशातील लाभार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान या योजनेअंतर्गत बांधलेल्या १ लाख ७५ हजार घरांच्या ‘गृहप्रवेश’ सोहळ्यात आज दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते त्यावेळी ते बोलत होते.

चांगल्या हेतूनं आखलेल्या सरकारी योजना नेहमीच साकार होतात आणि त्यांचा लाभही लाभार्थ्यांना मिळतो. सरकारी योजना ब-याच वर्षांपासून आहेत पण त्यात सरकारी हस्तक्षेप जास्त असल्यामुळे तसंच त्या लोकाभिमुख नसल्यामुळे कधीच पूर्ण झाल्या नाहीत असं मोदी म्हणाले.

आताच्या योजनेत कोरोना काळात ४० ते ६० दिवसांमध्ये पक्की घरं तयार झाली. यात शहरांमधून गावात परतलेल्या कामगारांचं योगदान आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमुळे त्यांना गावात रोजगार मिळाला. बांधकाम साहित्याचा व्यापार करणाऱ्यांनाही या योजनेमुळे फायदा झाला असं पंतप्रधान म्हणाले.

कार्यक्रमात त्यांनी सुरुवातीला योजनेच्या लाभार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे या मोदी यांच्या २०१६ साली केलेल्या घोषणेनुसार प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना या उपक्रमांतर्गत या घरांची निर्मिती करण्यात आली आहे. या अंतर्गत आतापर्यत देशभरात १ कोटी १४ लाख घरे उभारण्यात आली आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा