ऑस्ट्रेलिया, १७ डिसेंबर २०२०: गेल्या कित्येक दिवसांपासून सर्वजण डोळ्यात तेल घालून वाट पाहत असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेची गुरुवारपासून (१७ डिसेंबर) सुरुवात झाली. ऍडलेड येथे सुरु असलेला पहिला कसोटी सामना पाच दिवस चालेल. मात्र, या सामन्याच्या एक दिवसआधीच बीसीसीआयने भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली होती. सहसा भारतीय संघ असे करत नाही. त्यामुळे यावेळी असे करण्यामागे भारतीय संघाचा नेमका उद्देश काय होता?, याचा खुलासा कर्णधार विराट कोहलीने केला आहे.
नाणेफेकी दरम्यान बोलताना विराट म्हणाला की, “आधीपासूनच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेविषयीच्या सर्व गोष्टींची आम्ही पूर्ण तयारी करुन ठेवली होती. याच कारणामुळे पहिल्या कसोटी सामन्याच्या एक दिवसआधी प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली. ऑस्ट्रेलिया संघाच्या आधी प्लेईंग इलेव्हन जाहीर केल्यामुळे आम्ही आनंदी आहोत.”
तसेच पहिल्या कसोटी सामन्याविषयी बोलताना विराटने रात्रीचे सत्र अधिक आव्हानात्मक ठरणार असल्याचे सांगितले. विराट म्हणाला, “मी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील फक्त पहिला सामना खेळणार आहे. त्यामुळे माझ्या संघाला ही मालिका जिंकून देण्यात योगदान देण्याची ही माझी एकमेव संधी आहे. त्यामुळे मी माझ्या शैलीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न करेन.” अर्थातच विराट त्याच्या कुवतीपेक्षाही उत्तम फलंदाजी करेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे