मुंबई, २० फेब्रुवारी २०२३ : हे वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीसाठी अतिशय महत्त्वाचे वर्ष आहे. ता. २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ या हिंदी चित्रपटाने अनेक विक्रम तोडीत बॉक्स ऑफिसवर यश मिळविले. असेच यश मिळविण्याच्या उद्देशाने प्रदर्शित झालेल्या कार्तिक आर्यनच्या ‘शहजादा’ या चित्रपटाला मात्र हवा तसा प्रतिसाद मिळालेला दिसला नाही. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ६ कोटी, दुसऱ्या दिवशी ६.६५ कोटी, तर तिसऱ्या दिवशी ७.५५ कोटी रुपये कमावले. त्यामुळे या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई २०.२० कोटी एवढी झाली आहे.
चित्रपटाचा अपयशाचे काय असेल कारण-
शहजादा या चित्रपटातील कार्तिक आर्यनचा ‘भुलभुलय्या २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला. या चित्रपटाने पहिल्या विकेटमध्ये 55 कोटींपर्यंतचा गल्ला जमवला होता; परंतु ‘शहजादा’ हा चित्रपट मागे पडण्याचा नक्की कारण काय, हे समजून घेऊयात. तसं बघायला गेलं तर हा चित्रपट जास्तीत जास्त माणसांपर्यंत पोचविण्यासाठी ‘बाय वन गेट वन फ्री’ अशा ऑफर्स देण्यात आल्या होत्या; परंतु असे असतानाही चित्रपटाची कमाई हवी तेवढी झाली नाही. याचे एक कारण म्हणजे जानेवारी महिन्यातच प्रदर्शित झालेला शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट.
पठाण चित्रपट अनेक दिवसांपासून जगभरात यशस्वी कमाई करीत आहे. त्यामुळेच शहजादा या चित्रपटाला आर्थिक फटका बसला असेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. तर चित्रपट कमी चालण्याचे अजून एक कारण म्हणजे ‘अला वैकुंठपुरामुलु’ ह्या तेलगू ब्लॉकबस्टर चित्रपटाचा शहजादा हा हिंदी रिमेक आहे. त्यामुळे अनेकांनी हा चित्रपट यापूर्वी बघितला असल्याची शक्यता आहे. एवढेच नाही, तर या चित्रपटाचा हिंदी डबिंग व्हर्जनसुद्धा यूट्युबवर प्रेक्षकांसाठी मोफत उपलब्ध असल्याने चित्रपटास फारसा प्रतिसाद मिळाला नसेल.
कार्तिक आर्यनने या चित्रपटाच्या माध्यमातून सहनिर्मितीसुद्धा केली
‘शहजादा’ हा तेलगू ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रिमेक आहे. ज्यामध्ये अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहेत. शहजादा या चित्रपटात कार्तिकसोबत क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर परेश रावल, मनीषा कोईराला, रोनित रॉय, सचिन खेडेकर आणि राजपाल यादव यांसारखे दिग्गजही वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसत आहेत. विशेष म्हणजे कार्तिक आर्यनने पहिल्यांदाच सहनिर्मितीकार ही भूमिका साकारली आहे. पहिल्या तीन दिवसांची कमाई पाहता चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे