नॉर्वे, ९ ऑक्टोंबर २०२०: सन २०२० चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. यावेळी ती एक व्यक्ती नसून संस्था आहे. यावेळी हा सन्मान वर्ल्ड फूड प्रोग्राम संस्थेला देण्यात आला आहे. जगभरामध्ये तवाणपूर्ण आणि युद्धजन्य परिस्थिती असणाऱ्या प्रदेशांमध्ये अन्न पुरवठा करण्याचे आणि तेथे शांततेसाठी काम करणाऱ्या डब्ल्यूएफपी’च्या नावाची घोषणा नॉर्वेतील ऑस्लो येथील समितीने केली आहे. नॉर्वेजियन नोबेल समितीनं शुक्रवारी याची घोषणा केली. वर्ल्ड फूड प्रोग्राम या संयुक्त राष्ट्र संघटनेनं जगातील निरनिराळ्या भागातील भुकेलेल्यांना खाण्यासाठी, सर्वात जास्त तणाव असलेल्या ठिकाणी मदत करण्यासाठी हा सन्मान देण्यात आला आहे.
१९०१ पासून शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यास सुरूवात झाली व ते नॉर्वे संसदेने नेमलेल्या समितीच्या निवडीनुसार दिले जात आहे. कोणीही उपाशी झोपू नये म्हणजेच झीरो हंगर या मोहिमेसाठी डब्ल्यूएफपी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये काम करत आहे. नोबेल समितीनं सामायिक केलेल्या माहितीनुसार, वर्ल्ड फूड प्रोग्राम ही जगातील सर्वात मोठी संस्था असून ती अन्न मदत पुरवते. सन २०१९ मध्ये डब्ल्यूएफपी’नं ८८ देशांमधील १०० दशलक्ष लोकांना अन्न दिलं. २०१५ मध्ये, संयुक्त राष्ट्रांनी प्रत्येकाला पोसण्यासाठी नवीन मिशन मानले. आकडेवारीनुसार, सन २०१९ मध्ये सुमारे १३५ दशलक्ष लोक उपासमारीनं पीडित झाले होते, याचं सर्वात मोठा कारण आपात्कालीन व युद्धजन्य परिस्थिती होती.
ज्या लोकांना स्वत: अन्न पदार्थ विकत घेणं शक्य नसतं किंवा ज्यांना उत्पादन करता येत नाही, अशा गरजूंना डब्ल्यूएफपीच्या माध्यमातून अन्नधान्य पुरवले जाते. २०१८ साली या संस्थेमध्ये १७ हजार कर्मचारी काम करत होते. नाजझेरिया, सुदान, काँगो, येमेनसारख्या देशांमध्ये या संस्थेने मोठं कार्य केलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे