‘त्या’ नऊ गोचीडांमुळे मातोश्रीवर आली ही वेळ; संदिपान भुमरे यांची टीका

मुंबई, २६ सप्टेंबर २०२२ : ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हा फॉर्म्युला मोडीत काढत ‘त्या’ नऊ गोचीडांनी सर्व सामान्य कार्यकर्त्यांना मातोश्रीपर्यंत पोहोचू दिले नाही. त्यामुळे आज शिंदे गटाने उठाव केला, अशी टीका राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी केली. संदिपान भुमरे हे दोन दिवस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. रविवारी नागपूरकडे जाताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर बोट ठेवले. मातोश्री हे तमाम शिवसैनिकांचे आधारस्तंभ आहे. मात्र, या मातोश्रीत उद्धव ठाकरे यांच्या जवळील नऊ गोचीडांनी पुरती शिवसेना धुळीस मिळविली, असा टोला सुद्धा त्यांनी लगावला.

भाजप आणि शिवसेना युतीतून लढले. सत्तेत बसायच्या वेळेस काही लोकांनी विचारांशी फारकत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आघाडी केली. तरी आम्ही शांत होतो. सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, अजित पवार यांच्याकडे गेले की आमच्यासाठी निधीची कमतरता असायची. आम्हाला फक्त मुख्यमंत्रीपद होते. बाकी सत्ता ही काँग्रेस-राष्ट्रवादीची होती असेही भुमरे म्हणाले. म्हणूनच मातोश्रीला ‘त्या’ गोचीडांमुळे आज हे दिवस पहावे लागत आहे. मात्र, त्यांनी हे नऊ गोचीड कोण? याबाबत नावे न सांगण्याचे टाळले. वेळ आल्यानंतर ही नावे जाहीर करू, असे भुमरे यांनी आवर्जून सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा