पुणे, १० सप्टेंबर २०२०: प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यातला वाद चांगलाच रंगला आहे. कंगना राणावत मुंबईत वाय प्लस सिक्युरिटी घेऊन दाखल झाली आणि मुंबई महापालिकेतर्फे पाली हिल येथील कार्यालयावर कारवाई केल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावत अतिशय आक्रमक झाली आहे. संतप्त झालेल्या कंगना राणावतने एक व्हिडिओ ट्विट केला आणि त्यात तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. या सर्व प्रकरणावर खासदार अमोल कोल्हे यांनी भाष्य केले आहे.
कोणाला किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायला हवं, कंगणाचा बोलविता धनी कोण आहे, याची सुज्ञ जनतेला कल्पना आहे, असं अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे. एका बाजूला अर्थव्यवस्था संकटात असताना दुसऱ्या बाजूला दर दिवशी कोरोनाचे जवळपास ९० हजार रुग्ण सापडत आहेत. आरोग्य व्यवस्था तोकडी पडू लागली आहे. यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच कंगणाला नाहक महत्त्व दिलं जात असल्याचं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
दरम्यान, कलाकारांना सामाजिक भान असायला हवं. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपायला हवी. मुंबई पोलिसांमुळे आज शहर सुरक्षित आहे, असं अमोल कोल्हे म्हणालेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे