ही असेल इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख, मुदतीत वाढ

नवी दिल्ली, ११ सप्टेंबर २०२१: करदात्यांना दिलासा देत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) पुन्हा एकदा आयकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख वाढवली आहे.  यामुळे करदात्यांना मूल्यांकन वर्ष २०२१२२ साठी आयटीआर दाखल करण्यासाठी अधिक वेळ मिळेल.
 ३१ डिसेंबर ही नवीन शेवटची तारीख असेल
 आयकर विभागाने ट्विट करून माहिती दिली की, आयटीआर आणि विविध प्रकारचे ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे.  आता ITR भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२१ असेल.  या आधी ही तारीख  ३० सप्टेंबर २०२१ होती.
 ऑडिट अहवाल १५ जानेवारीपर्यंत सादर केला जाईल
 त्याचप्रमाणे आयकर कायद्याच्या कोणत्याही तरतुदीअंतर्गत सादर करावयाचा ऑडिट अहवाल आधी ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आला होता.  आता त्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे.  त्याचप्रमाणे, काही तरतुदींसाठी, अंतिम तारीख २८ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
 वित्त मंत्रालयाने सांगितले की, आयकर रिटर्न भरताना करदात्यांना येणाऱ्या अडचणी आणि विविध ऑडिट रिपोर्ट पाहता आयकर विभागाने हा निर्णय घेतला आहे.  विशेष म्हणजे, आयकर विभागाने यावर्षी ६ जून रोजी आपले नवीन पोर्टल सुरू केले होते.  तेव्हापासून यावर सतत समस्या येत होत्या.  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही ही वेबसाईट हाताळणारी कंपनी इन्फोसिस बाबत अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे.  यामुळे, आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख आधी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा