पुण्यातील यंदाचा गणेशोत्सव साजरा होणार पारंपरिक,साध्या पद्धतीने

पुणे, दि.२१ मे २०२०: पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव यंदा पारंपारिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय मानाच्या गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, सर्वांनी आपली काळजी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

पुण्यात कोरोना संसर्गजन्य रोगाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचे स्वरूप ठरविण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला श्री कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, सौरभ धोकटे, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, प्रसाद कुलकर्णी, सौरभ धडफळे, केशव नेउरगांवकर, अनिरुद्ध गाडगीळ, श्री गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी, राजू परदेशी, पृथ्वीराज परदेशी, श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष शिल्पकार विवेक खटावकर, नितीन पंडीत, विकास पवार, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, उत्सव प्रमुख पुनित बालन, अखिल मंडई मंडळाचे खजिनदार संजय मते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी उपस्थित होते.

यंदाचा सार्वजानिक गणेशोत्सव उत्सव मंडप उभारून अत्यंत साध्या पद्धतीने पूजाअर्चा, गणेश याग, मंत्र जागर, अथर्वशीर्ष, आरती असे सर्व धार्मिक विधि पार पाडून नागरिकांच्या तसेच गणेशभक्तांच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेऊन साजरा करण्यात येणार आहे.

यंदाच्या वर्षी शासनाला सहकार्य करून सर्व गणेश मंडळांना विश्वासात घेऊन या संदर्भात बैठक घेण्यात येणार आहे. यावर्षी नियम व अटींचे काटेकोर पणे पालन करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. तसेच सर्व गणेश मंडळांनी अथवा मूर्तिकारांनी आपल्या गणरायाला कोणत्याही प्रकारचा मास्क न लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा