यंदाचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, विशाल बनकरला केलं चितपट

सातारा, 10 एप्रिल 2022: यंदाचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील हा ठरला आहे. त्याने विशाल बनकरला फायनलमध्ये चितपट केलं आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही साताऱ्यात रंगली होती. या कुस्ती स्पर्धेकडे मोठ्या संख्येने नजरा लागल्या होत्या. यंदाची फायनलची लढत सोलापूर विरुद्ध कोल्हापूर यांच्यात सुरू होती. सोलापूरचा विशाल बनकर (Vishal Bankar) विरुद्ध कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील अशी ही लढत होती. या अंतिम सामन्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक जमा झाले होते. सुरूवातील विशाल बनकरने आघाडी घेतली होती. मात्र पृथ्वीराजने चार गुणांची पिछाडी भरून काढत पाच विरुद्ध चार असा विजय मिळवला.

या अगोदर पृथ्वीराजने पुणे शहरच्या हर्षद कोकाटेवर एकतर्फी विजयाची नोंद केली होती, तर शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत विशालने वाशिमच्या सिकंदर शेखवर तेरा विरुद्ध दहा गुण फरकाने मात केली होती.

यंदाचा विजेता पृथ्वीराज पाटील हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील गाव पन्हाळा तालुक्यामधील देवठाणे गावचा आहे. त्याने मोतीबाग तालमीतून कुस्तीची सुरूवात केली तर वस्ताद महान भारत केसरी दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील आणि धनाजी पाटील यांच्याकडून तो कुस्तीचे डावपेच शिकला आहे, त्याचे सध्याचे वजन 95 किलो असल्याची माहिती देण्यात आली आहे. पृथ्वीराज पाटील याने संजीवनीदेवी गायकवाड महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण घेतलं. एवढेच नाही तर आर्मीत हवालदार पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा