फेसबुक दिंडीच्या ई- वारकऱ्यांसाठी यंदा “माझ्या आठवणीतील वारी” उपक्रम

यावर्षी कोरोना विषाणूमुळे पंढरीची वारी होईल की नाही या बाबत सध्या निर्णय झालेला नाही. यंदा फेसबुक दिंडीच्या माध्यमातून जे वारकरी दरवर्षी वारीला जातात किंवा ज्यांनी वारी केली आहे, त्यांच्यासाठी “माझ्या आठवणीतील वारी” हा अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

‘आठवणीतली वारी’ या उपक्रमाअंतर्गत वारकरी त्यांचे वारीतले अनुभव कथन करणार आहेत. लहान मुलं घरातल्या घरात संतांची वेशभूषा करू शकतात, ते क्षण शेअर करू शकतात. लॉकडाऊनमुळे अनेकांना पायी वारी करणं शक्य होणार नाही. अशावेळी “व्हर्च्युअल वारी” हा उत्तम पर्याय ठरू शकतो. व्हर्च्युअल वारीच्या माध्यमातून ई- वारकऱ्यांना वारीची माहिती मिळण्यास मदत होईल.

ज्या वारकऱ्यांना पंढरीच्या वारीला जाता येत नाही. त्या वारकऱ्यांसाठी आणि विठ्ठलाच्या भक्तांसाठी मागील नऊ वर्षांपासून ‘फेसबुक दिंडी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. फेसबुक दिंडीच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत वारीचे क्षणचित्रे पोहचत असतात. तसेच सामाजिक बांधिलकी जपत वारीच्या काळात वेगवेगळे सामाजिक उपक्रमही राबवले जातात.

माझ्या आठवणीतील वारी उपक्रमाअंतर्गत फेसबुक दिंडीकडे नऊ वर्षांचं फुटेज आहे. त्यातून वारीतले क्षण पुन्हा निर्माण करण्याचं त्यांनी ठरवलं असून घरबसल्या लोकांना वारीचा अनुभव देणार आहेत.

या उपक्रमात वारीत चालणारा वारकरी आणि कलेचा वारकरी असणारे कलाकार ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वारी अनुभवली आहे, ते सर्व आपले अनुभव कथन करणार आहेत. या उपक्रमाच्या प्रसिद्धीबाबत सुद्धा काम सुरू आहे. याच बरोबर प्रेक्षक सुद्धा आपले वारीतील फोटो, व्हिडीओ टीमला पाठवू शकतात. तरुणांपासून ते जेष्ठ वारकरी यातून आपले वारीतील अनुभव सांगणार आहेत.

यंदा पंढरीच्या वारीतील पालखी सोहळा आणि पायी वारी होणार की नाही याबाबत साशंकता असल्यामुळे गेली दहा वर्ष आपल्या लाखो ई – वारकऱ्यांना वारीचे दर्शन घडवणाऱ्या फेसबुक दिंडी टिमवर सर्व भाविकांना वारी घडवण्याची मोठी जबाबदारी आहे. यासाठी टीम फेसबुक दिंडीचे स्वप्नील मोरे, मंगेश मोरे, सुरज दिघे अमित कुलकर्णी, राहूल बुलबुले, ओंकार मरकळे,ओंकार महामुनी, सुमित चव्हाण, अमोल गावडे, संतोष पाटील हे अहोरात्र काम करत आहेत.

यंदा फेसबुक दिंडीचे दहावे वर्ष आहे. मागील नऊ वर्षांत जे फोटो आणि व्हिडिओ शूट केले आहेत. त्यातून यंदा वारीचा प्रत्यक्ष अनुभव देण्याचा प्रयत्न असणार आहे. “माझ्या आठवणीतील वारी” हा मुख्य उपक्रम यावर्षी असणार आहे. त्यासाठी तयारी सुरू झाली आहे. याचबरोबर यावर्षी होणाऱ्या वारीचे क्षणचित्रे सुध्दा दाखवणार आहोत.
-स्वप्नील मोरे, संस्थापक फेसबुक वारी

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा