पुणे, २ जुलै २०२३ : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडत आपल्या समर्थक आमदारांसह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर काही वेळाने शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. आमदार सोडून जाणे हा असला प्रकार मला नवीन नाही. तो इतरांना नवीन असेल. १९८० साली ५८ आमदार निवडून आले होते. त्यावेळी मी विरोधी पक्षनेता होतो. पण नंतर आमदार सोडून गेल्यानंतर मी फक्त पाच आमदारांचा विरोधी पक्ष नेता होतो. पुढे झालेल्या निवडणुकीत जे पक्ष सोडून गेले ते पुन्हा निवडून आले नाहीत. असे पवार म्हणाले.
मागच्या विधानसभा निवडणुकीतही हीच परिस्थिती होती मला महाराष्ट्रातील जनतेवर आणि विशेषता तरुणांवर विश्वास आहे. यामुळेच आम्ही संयुक्त सरकार स्थापन केले. आज पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. देशाच्या कानाकोपऱ्यातून मला फोन येत आहेत. यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तृणमूलच्या ममता बॅनर्जी यांचे फोन आले. आम्ही तुमच्यासोबत आहोत असे त्यांनी सांगितले. विरोधकांची एकजूट करण्यासाठी आम्ही अधिक आक्रमकपणे भूमिका घेऊ असेही यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले.
पुढे बोलताना पवार म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचारी म्हणून आरोप केला जात होता. आज जे त्यांच्याबरोबर गेले त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप होते. त्यांनीच शपथ घेतली त्यामुळे हा आरोप चुकीचा आहे. त्यामुळे पक्षाकडेही आता कोणी बोट दाखवू शकत नाही. उद्यापासून मी बाहेर पडणार असून पहिला कार्यक्रम दलित मेळाव्याचा घेणार असल्याचेही यावेळी पवारांनी नमूद केले.
पक्षाचे नाव घेऊन कोणी काही भूमिका घेतली तरीही आम्ही भांडत बसणार नाही. आम्ही लोकांच्यात जाऊन आमची भूमिका समजावून सांगू. माझा पक्षातल्या कार्यकर्त्यांवर प्रचंड विश्वास आहे. सामान्य माणूस आणि कार्यकर्ता ही आमची शक्ती आहे. त्यांच्यामध्ये आजच्या घटनेमुळे निराशा आली असेल. आजपर्यंत ज्या विरोधकांशी संघर्ष केला त्यांच्यासोबत आम्ही सत्तेत सामील झालो. हे कार्यकर्त्यांना न पटणारे आहे. यासाठी आता नव्याने पक्ष बांधणीच्या कामाला वेग देणार असल्याचेही पवारांनी स्पष्ट केले.
ज्या आमदारांना बोलावून घेऊन त्यांच्या सह्या घेतल्या, त्यांचेही मला फोन आले. आमचा याच्याशी काहीही संबंध नाही. आम्ही तुमच्याबरोबरच असल्याचे त्यांनी मला सांगितले असल्याचे शरद पवार म्हणाले. मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून ज्यांच्या नेमणुका केल्या आहेत त्याच्यामध्ये विशेषता जनरल सेक्रेटरी म्हणून प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली नाही. त्याबद्दल त्यांनी स्वतः कारवाई करून घ्यावी, किंवा मी करेल. पक्ष विरोधी कारवाया करणाऱ्यांवर पक्ष कारवाई करणार असल्याचे यावेळी शरद पवार म्हणाले.
छगन भुजबळांनी जाताना तेथे काय होते ते पाहतो असे सांगून गेले, पण त्यांनी शपथ घेतल्याचे कळवले. असे मीश्किलपणे शरद पवार म्हणाले. पक्षांमध्ये ज्यावेळी अशी परिस्थिती येते त्यावेळी मला जास्त हुरूप येतो. लोकांच्यात जाऊन मी भूमिका मांडतो आणि उभारी घेतो. त्यामुळे उद्याच्या निवडणुका झाल्यावर आमची नवीन टीम बघायला मिळेल, असेही शरद पवार यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर