पिंपरी-चिंचवड शहरासह औद्योगिक भागातील हजारो कंन्यांना महावितरणच्या संपाचा फटका

पिंपरी, ५ जानेवारी २०२३ : महावितरणच्या संपाचा फटका पिंपरी-चिंचवड शहरासह औद्योगिक (एमआयडीसी) भागातील हजारो कंपन्यांना बुधवारी (ता. चार) बसला. भोसरी एमआयडीसी सेक्टर क्रमांक ७ व टी ब्लॉकमध्ये सकाळी ८.१५ ते १२.१५ या वेळेत वीज गेल्याने कंपन्यांचे काम ठप्प झाले. कामगारांना चार तास बसून राहावे लागल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम झाला. नवीन वर्षालाच उद्योगांना ग्रहण चालू झाल्याचे दिसत आहे, असे मत उद्योजकांनी व्यक्त केले. एमआयडीसी परिसरात काही भागात वीज गेल्यामुळे हजारो कंपन्या बंद होत्या. तर तळवडे, चिखली-कुदळवाडी या भागांतही दिवसभरात अनेकवेळा वीज गेली. महावितरणने पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. सरकारने पर्यायी व्यवस्था केली असल्याचे जरी सांगत असले तरी मनुष्यबळच नसल्यामुळे पिंपरी- चिंचवड एमआयडीसी क्षेत्रामध्ये सात ते आठ हजार उद्योग आहेत. अनेकदा काही परिसरात ट्रान्सफॉर्मर हे नादुरुस्त होत असल्यामुळे त्याला नियंत्रित करणे गरजेचे आहे.

आधीच महावितरणकडे मनुष्यबळाची कमतरता असून, राज्य सरकारने वेळीच महावितरणची दखल घेऊन उद्योगांना शेकडो कोटींचा बसणारा फटका टाळावा. दिवसाच्या सुरवातीलाच अनेक उद्योग हे विनावीजपुरवठ्यामुळे बंद होते. त्याचा उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे दिसून आले. अशीच परिस्थिती राहिल्यास उद्योजकांनासुद्धा शासनाविरुद्ध आंदोलन उभे करावे लागेल.

  • अभय भोर, अध्यक्ष फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन, महाराष्ट्र राज्य.

दिवसातून चार तास वीज गेली. त्याचा परिणाम उत्पादनावर पडला. चार तास कामगारांना बसून राहावे लागले. त्यांचा चार तासांचा पगार वाया गेला. त्यामुळे उत्पादनाचा तोटा झाला. महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन केल्यावर त्यांनी मनुष्यबळ नसल्याचे कारण सांगितले. मग मुंबईतून महावितरणने प्रसिद्धिपत्रकाद्वारे पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात संप काळात आपत्कालीन वेळेत विजेची पर्यायी व्यवस्था केल्याचा दावा फोल ठरला.

  • संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश भागांत सकाळपासूनच वीज नसल्यामुळे अनेक कामे खोळंबली होती. ग्रामीण भागातील जवळपास पन्नास टक्के भागात वीजपुरवठा खंडित होता. ग्रामीण भागातील शेती पंपाच्या वीजपुरवठा खंडित झाला आहे; तसेच अनेक भागांत वीजपुरवठा सकाळपासूनच बंद होता. त्यामुळे संपाचा फटका काही प्रमाणात शहरवासीयांनाही बसला.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा