दिल्ली, ३१ जानेवारी २०२३ : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एका व्यक्तीने ठार मारण्याची धमकी दिली आहे; मात्र पोलिसांनी त्या व्यक्तीची ओळख पटवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणारी व्यक्ती मुंडका येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. जय प्रकाश असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची मानसिक स्थिती ठीक नाही. आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, की आरोपीने रात्री उशिरा दिल्ली पोलिसांना फोन करून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. यानंतर पोलिस सतर्क झाले आणि आरोपीचा शोध घेण्यास सुरवात केली. यानंतर तो मुंडका येथील रहिवासी असल्याचे समजले. त्याला अद्याप अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. कदाचित त्याची मानसिक स्थिती ठीक नसेल; मात्र पोलिसांचे पथक त्याची चौकशी करीत आहे.
याआधी २०१९ मध्ये अरविंद केजरीवाल यांना बदमाशांनी ठार मारण्याची धमकी दिली होती. केजरीवाल यांच्या कार्यालयातील एका निनावी ई-मेल आयडीवरून दोन धमकीचे ई-मेल आले आहेत. यामध्ये त्यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. या ई-मेलनंतर दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहून दिल्ली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ई-मेल पाठविणाऱ्या व्यक्तीने आपण मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे धमकीच्या शब्दात लिहिले होते. त्यासाठी तो शस्त्रे गोळा करीत आहे.
२०२२ मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाल्याची बातमी समोर आली होती. मनीष सिसोदिया यांनी सांगितले होते, की काही समाजकंटकांनी केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला आणि सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा अडथळे तोडले. यासोबतच गेटवरील बूम बॅरिअरही तुटला. या संपूर्ण हल्ल्याबाबत सिसोदिया यांनी भाजपला घेरले होते. भाजपच्या गुंडांनी केजरीवाल यांच्या घराची तोडफोड केल्याचे ते म्हणाले होते. भाजपला अरविंद केजरीवाल यांना मारायचे आहे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या घरावर हा हल्ला सुनियोजित कटाअंतर्गत करण्यात आला होता.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड