नागपूर, १५ जानेवारी २०२३ :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तीने तीन वेळा कॉल करुन शनिवारी शंभर कोटींची मागणी केली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केल्यानंतर हे कॉल बेळगावच्या कारागृहातून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कॉल एका सराईत गँगस्टरने केला असून, एका हत्या प्रकरणात तो सध्या बेळगाव तुरुंगात कैदेत आहे. धमकी देणाऱ्या गुन्हेगाराचे नाव जयेश पुजारी असे आहे. तुरुंगाच्या आत त्याच्याकडे नियमबाह्य पद्धतीने असलेल्या फोनच्या माध्यमातून त्याने हे कॉल केले. यापूर्वी २०१६ मध्ये तो जेल तोडून पळून गेला होता. शिवाय त्याने जेलमधूनच अशाच पद्धतीने अनेक वेळा पूर्वीही मोठे अधिकारी आणि इतरांना धमकीचे कॉल केल्याची माहिती आहे. दरम्यान, पुढील तपासासाठी नागपूर पोलिसांची एक टीम तातडीने बेळगावला रवाना झाली आहे.
नेमके प्रकरण काय?
अज्ञात व्यक्तीकडून शनिवारी नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात एकूण तीन वेळा हे कॉल आले होते. या कॉलमध्ये दाऊद असा उल्लेख देखील करण्यात आला होता.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.