कच्चा माल वाहून नेणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल, महिंद्रा कॅम्पर गाडीवर आदळल्याने अभियंत्यासह तिघांचा मृत्यू

गडचिरोली, ७ ऑगस्ट २०२३ : गडचिरोली जिल्ह्यातील एट्टापली तालुक्यात सुरजागड लोह खनिज प्रकल्पात एक भीषण अपघात झाला आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी ब्रेक फेल होऊन नियंत्रण सुटलेला ट्रक, महिंद्रा कॅम्पर गाडीवर जोरदार आदळला. त्यामुळे या गाडीमधील पाच जणांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला. या तिघांपैकी एकजण इंजिनीअर आहे. तर दोन जण जखमी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे सुरजागडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात एट्टापली तालुक्यामध्ये सुरजागड लोह खनिज प्रकल्पातील लँड मेटल कंपनीत ही घटना घडली. काल सायंकाळी कामावरून परत येत असताना कच्चा माल वाहतुक करणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले. हा ट्रक समोरून येणाऱ्या महिंद्रा कॅम्पर गाडीवर आदळला. त्यात महिंद्रा कॅम्परमध्ये असलेल्या पाच जणांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांमध्ये हरियाणातील दोन मजुरांचा समावेश आहे. तसेच अहेरी तालुक्यातील अभियंते सोनल रामगिरीवर यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातातील दोन गंभीर जखमींना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण या दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

या लोह खनिज प्रकल्पाच्या खाणी उंच डोंगरावर आहेत. तेथून लोह खनिजाचा कच्चा माल खाली आणण्यात येतो. तेथून सदर कच्चामाल चंद्रपूरात नेण्यात येतो. या कच्च्या मालाच्या वाहनांमुळे अनेक अपघात या कालावधीत होत असतात. काल लगाम बोरी परिसरात कच्चा माल वाहून नेणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर संध्याकाळी हा भीषण अपघात झाला.

काल सायंकाळच्या वेळी लँड मेटल कंपनीच्या खाणीत ही घटना घडली. या अपघातानंतर लँड मेटल कंपनी परिसरात तणाव निर्माण झाला होता. मजुरांनी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे या पोलिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा