पालघरमध्ये मुसळधार पावसाने तिघांचा मृत्यू, ‘रेड अलर्ट’ नंतर शाळा २ दिवस बंद राहणार

पालघर, २१ जुलै २०२३: महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये गुरुवारी तीन जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख विवेकानंद कदम यांनी सांगितले की, पालघरमध्ये मंगळवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि जिल्ह्यातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तीन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील वसईतील पुरात अडकलेल्या ८० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती कदम यांनी दिली. दरम्यान, बीएमसी (बृहन्मुंबई महानगरपालिका) अधिकाऱ्याने सांगितले की, घाटकोपरच्या बटवाडी भागात भूस्खलनानंतर खबरदारीचा उपाय म्हणून १०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

पालघर आणि लगतच्या ठाणे जिल्ह्यांत हवामान खात्याने अतिवृष्टीसाठी दिलेल्या ‘रेड अलर्ट’ नंतर संबंधित जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांनी, शुक्रवार आणि शनिवारी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तर महाराष्ट्रात बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील इर्शालवाडी गावात दरड कोसळून १६ जणांचा मृत्यू झालाय.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा