जम्मू-काश्मीर, ५ ऑगस्ट २०२२: जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवून आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. कलम ३७० हटवल्यानंतर दहशतवादी घटनांमध्ये घट झाली आहे. यासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेच्या घटनेत एकाही नागरिकाचा किंवा जवानाचा मृत्यू झालेला नाही. दहशतवादी घटनांमध्ये सामान्य लोकांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे.
कलम ३७० रद्द करण्यापूर्वी ३ वर्षांच्या आणि नंतरच्या घटनांची तुलना करताना, जम्मू-काश्मीर पोलिसांनी काश्मीर झोनमध्ये दहशतवादी घटनांमध्ये घट झाल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणांची सहा प्रकारात विभागणी केली आहे.
त्यापैकी ५ ऑगस्ट २०१६ ते ४ ऑगस्ट २०१९ दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेच्या ३,६८६ घटना घडल्या, ५ ऑगस्ट २०१९ ते ४ ऑगस्ट २०२२ या कालावधीत केवळ ४३८ घटना घडल्या. याशिवाय ३७० रद्द करण्याच्या तीन वर्षांपूर्वी कायदा आणि सुव्यवस्थेच्या घटनांमध्ये १२४ नागरिकांचा मृत्यू झाला होता, जो विशेष दर्जा काढून टाकल्यानंतर शून्य झाला होता. याशिवाय अशा घटनांमध्ये सहा जवानही शहीद झाले, मात्र २०१९ नंतर एकही जवान शहीद झालेला नाही.
३७० हटवण्यापूर्वी २९० जवान शहीद झाले होते
काश्मीरमधील दहशतवादी घटनांबद्दल बोलायचे झाल्यास, ५ ऑगस्ट २०१६ ते ४ ऑगस्ट २०१९ दरम्यान एकूण ९३० घटना घडल्या, ज्या ३७० हटवल्यानंतर ६१७ वर आल्या. या दहशतवादी घटनांमध्ये २९० सैनिक शहीद झाले आणि ३७० लागू होण्यापूर्वी १९१ नागरिकांचा मृत्यू झाला, कलम ३७० रद्द केल्यानंतर ३ वर्षांनी १७४ सैनिक शहीद झाले आणि ११० लोक मारले गेले.
वर्धापनदिनाच्या एक दिवस आधी दहशतवाद्यांनी हल्ला केला
जम्मू-काश्मीरमधून संविधानाचे कलम ३७० रद्द झाल्याच्या एक दिवस आधी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकून बिगर काश्मिरी मजुरांवर हल्ला केला. या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला, तर २ जण जखमी झाले, त्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे.
५ ऑगस्ट २०१९ रोजी हटवण्यात आले कलम ३७०
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे संविधानातील कलम ३७० हटवले होते, कलम ३७० हटवण्यास विरोधी पक्ष सातत्याने विरोध करत आहेत. पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स हे प्रादेशिक पक्ष सातत्याने कलम ३७० बहाल करण्याची मागणी करत आहेत. कलम ३७० रद्द केल्यामुळे काश्मीरमधील परिस्थिती बिघडल्याचे पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती सातत्याने सांगत आहेत, तर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला म्हणतात की, कलम ३७० हटवून भाजपने भारताचे विभाजन करण्याचे काम केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे