मुंबई, 12 फेब्रुवारी 2022: थम्स अप या पहिल्या देसी कोल्ड्रिंक ब्रँडने आता एक नवीन यश संपादन केलंय. तो आता भारतात एक बिलियन डॉलरचा ब्रँड बनला आहे. या ब्रँडची मालकी असलेल्या कोका-कोला कंपनीने ही माहिती दिली आहे.
ब्रँडचं मूल्य वाढवण्यामागील घटक
कोका-कोला कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ जेम्स क्विन्सी यांनी गुरुवारी आर्थिक निकाल जाहीर केल्यानंतर गुंतवणूकदारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, कंपनीच्या थम्सअप या स्थानिक ब्रँडचं भारतातील मूल्य 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झालंय. ते म्हणाले की मार्केटिंग आणि एक्सीक्यूशनच्या केंद्रित योजनेमुळं हे यश साध्य करण्यात मदत झाली.
मोरारजी देसाईंच्या सरकारमध्ये भारतातून एक्झीट
थम्सअप हा भारतातील पहिला कोल्ड्रिंक ब्रँड आहे. जरी या ब्रँडची मालकी कोका-कोलाकडं आहे, परंतु सुरुवातीपासून ती या कंपनीकडं नाही. खरं तर कोका-कोला भारतीय बाजारातून बाहेर पडल्यानंतर या ब्रँडचा जन्म झाला. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या सरकारने कोका-कोलाला भारतीय युनिटमधील मालकी कमी करण्यास सांगितलं होतं. कोका-कोला कंपनी भारतीय बाजारातून बाहेर पडली होती तेव्हाच थम्स अप ब्रँड 1977 मध्ये लॉन्च झाला.
या वर्षापर्यंत पार्लेचा होता थम्सअप ब्रँड
भारतात उदारीकरणानंतर, कोका-कोलाने 1993 मध्ये पुन्हा प्रवेश केला. यानंतर कोका-कोलाने पार्ले बिसलेरी कंपनीकडून थम्सअप ब्रँड विकत घेतला. कोका-कोलाने थम्सअपसह गोल्ड स्पॉट आणि लिम्का सारख्या कोल्ड ड्रिंक ब्रँडची मालकीही विकत घेतली. सध्या भारतीय कोल्ड्रिंक मार्केटमध्ये कोका-कोला आणि पेप्सी सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचं वर्चस्व आहे.
भारतातही कोका-कोलाचा व्यवसाय वाढला
कोका-कोलाने डिसेंबर तिमाहीत रेवेन्यू आघाडीवर नफा मिळवला. तिमाहीत निव्वळ रेवेन्यू 17 टक्के वाढून $38.7 बिलियन झाला, तर ऑर्गेनिक रेवेन्यू 16 टक्के वाढला. भारतासह आशिया पॅसिफिक बाजारपेठेतील कोका-कोलाचा रेवेन्यू 2019 नंतर प्रथमच 10 टक्क्यांपेक्षा कमी वाढला आहे. कंपनीने म्हटलंय की चीन, भारत आणि फिलिपाइन्समध्ये त्यांचा व्यवसाय वाढला आहे, तर ऑस्ट्रेलियामध्ये तो साथीच्या आजारामुळं घसरला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे