औरंगाबादमधील संचारबंदी अधिक कडक करा : आरोग्यमंत्रांचा आदेश

औरंगाबाद, दि. २७ एप्रिल २०२० : महाराष्ट्रामधे औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. सर्व यंत्रणांच्या साहाय्याने कोरोनाचा सामना करावा. याकामी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल. शहरातील प्रादुर्भावाचे प्रमाण कमी करण्यासाठी संचारबंदी अधिक कडक करावी, जेणे करून नवीन रुग्णांची भर पडणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबाद येथे रविवारी (दि.२६) रोजी सांगितले. येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
याप्रसंगी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, पोलिस उपायुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय, उपायुक्त वर्षा ठाकुर, पराग सोमण, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. कुलकर्णी, घाटीतील मेडिसिन विभागाच्या प्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य आदी उपस्थित होते.

यावेळी टोपे यांनी सांगितले की, या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुढील नियोजन अत्यंत बारकाईने करणे आवश्यक आहे. शहरातील मृत्युदर पाहता प्रत्येक रुग्णाचा अभ्यास करणे आवश्यक असून तो आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेने खबरदारी घ्यावी. शहरातील प्रादुर्भावाचे प्रमाण कमी करण्यासाठी सुरू असलेली संचारबंदी अधिक कडक करावी जेणेकरून नवीन रुग्णांची भर पडणार नाही. तसेच उपचारासाठी शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचीही मदत घ्यावी.

ग्रामीण भागातील दवाखाने सुरू राहतील यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. खासगी डॉक्टरांनीही याकामी पुढाकार घ्यावा, असेही टोपे यांनी यावेळी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा