राज्यातील पोलिसांनाच संरक्षण देण्याची वेळ; पोलिसांवर हल्ला करणार्‍यांवर सरकारने जरब बसवावी : अजित पवार

5

मुंबई, १५ मार्च २०२३ : राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलिस चोवीस तास कार्यरत असतात. अनेकवेळा जिवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावीत असतात; मात्र कर्तव्य बजावीत असताना त्यांच्यावरच हल्ले होत आहेत. गेल्या तीन महिन्यांत ३० हून अधिक हल्ले पोलिसांवर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांवर हल्ल्याचा प्रवृत्ती बळावू नये म्हणून असे गुन्हे करणाऱ्यांवर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र दाखल करण्याची आवश्यकता आहे.

या हल्ल्यांमुळे पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. श्री. अजित पवार म्हणाले की, राज्यात पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहेत. अंगावर गाडी चढवणे, गाडीसोबत फरपटत नेणे, लोकांनी पोलिसांच्या अंगावर धावून जाणे अशा घटनांमध्ये वाढ झालेली आहे.

नागरिकांच्या संरक्षणासाठी २४ तास कार्यरत असणाऱ्या पोलिसांनाही संरक्षण संपर्कासाठी वॉकी टॉकी, मोटारसायकल आदी गोष्टी पुरविण्याची आवश्यकता आहे. दोषींवर त्वरित कार्यवाही होण्यासाठी आणि पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी तसेच असे हल्ले होऊ नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा