गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबईमध्ये पश्चिम रेल्वे कडून चार विशेष गाड्यांची सोय

मुंबई, ३ सप्टेंबर २०२२: मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. तर गणरायाला मंगलमय वातावरणामध्ये निरोप देण्यासाठी हजारो मुंबईकर बाहेर पडत असतात. गणेश विसर्जनाच्या दिवशी मुंबईमध्ये प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी पश्चिम रेल्वे विभागाकडून चार विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे.

गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होत असते. याचा विचार करून पश्चिम रेल्वे विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. चर्चगेट ते विरार दरम्यान नऊ आणि दहा सप्टेंबरच्या मध्यरात्री चार जादा विशेष लोकल गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे व याची घोषणाही केली आहे.

मागचे दोन वर्ष सर्वांनाच कोरोनाचा सामना करावा लागला त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावरही निर्बंध होते, परंतु यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्यामुळे गणेशोत्सव सर्वत्र जल्लोषात साजरा केला जात आहे.

अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तींचे विसर्जन होते. या दिवशी मुंबई मध्ये लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होते . गणपती विसर्जनासाठी अनेक प्रवासी रात्री उशिरा प्रवास करतात. या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पश्चिम रेल्वे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विशेष लोकल गाड्या सोडणार आहे.

पश्चिम रेल्वे विभागाकडून सोडण्यात येणाऱ्या या विशेष लोकल रेल्वेगाड्यांमुळे अनंत चतुर्थीला गणेश विसर्जनासाठी घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांना आपला प्रवास सुकर होण्यास हातभार मिळणार आहे. रेल्वेच्या या निर्णयाचे प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे. विविध स्तरातून या निर्णयाचं स्वागत होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा