पुणे, ता. २५ डिसेंबर २०२२ : नाताळ, सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील मद्य ग्राहकांनी आतापर्यंत दीड लाखांपेक्षा अधिक परवाने घेतले आहेत. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता राज्य उत्पादन शुल्क विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदा नाताळ व नववर्षानिमित्त लाखो लिटर वाइन, बिअर आणि विदेशी मद्य पुणेकरांकडून रिचवले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील मद्यालये नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत. यंदा पार्ट्या, संगीत मैफिलींचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. मद्यालयात येणाऱ्या मद्य ग्राहकांच्या सुरक्षेसाठी मद्यालयचालकांनीच एक दिवसाचे मद्य परवाने घेऊन त्यांची सोय केली आहे. हे परवाने घेण्यासाठी व्यावसायिकांमध्ये चढाओढ सुरू झाली असून, आतापर्यंत दीड लाखापेक्षा अधिक मद्य परवान्यांची विक्री झाली आहे.
यंदा नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शहरालगतच्या पर्यटनस्थळांलगत असलेले ढाबे, रेस्टो-बार या ठिकाणी जल्लोषाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मद्य ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून ढाबे, रेस्टो-बारचालकांकडूनच एक दिवसाचे मद्य परवाने घेण्यात आले आहेत. यात देशी मद्यासाठी दोन रुपये, तर विदेशी मद्यासाठी पाच रुपयांत एक दिवसाचा परवाना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार नाताळ आणि नववर्षानिमित्त २५ आणि ३१ डिसेंबर रोजी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित जिल्ह्यातील मद्यालये पहाटे पाच वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत; तसेच वाइन, बिअर आणि देशी मद्यविक्रीची दुकाने रात्री साडेदहाऐवजी रात्री एक वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. मात्र, या काळात पुण्यात बनावट मद्यविक्री, वाहतूक आणि उत्पादन होऊ नये, म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाची नेहमीची १४ आणि खास दहा अशी एकूण २४ पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. या पथकांमार्फत फार्म हाउस, रिसॉर्ट, ढाबे यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. यासह अवैध पार्ट्या, बेकायदा मद्य पुरविणाऱ्या टोळ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासाठी ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत; तसेच या काळात लष्कराची, गोवानिर्मित, सीमाशुल्क मुक्त मद्य स्वस्तात उपलब्ध करून देण्याचे काहीजण प्रलोभने दाखवितात. मात्र, पुणे, पिंपरी-चिंचवडकरांनी अशा प्रलोभनांना बळी न पडण्याचे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील