मुंबई, दि. १८ मे २०२०: चौथ्या लॉकडाऊनची सुरुवात आजपासून झाली आहे. याविषयी सरकारने कोणते निर्णय घेतले आहेत व कोणती तयारी केली आहे हे जनतेला सांगण्यासाठी आज उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधला. आज आमदार म्हणून त्यांचा शपथविधी झाला त्याबद्दल त्यांनी सर्व मंत्र्यांचे आभार देखील मानले.
चौथ्या लॉकडाऊन विषयी सांगताना त्यांनी नियमांमध्ये फारशी शिथिलता दिलेली आढळली नाही. लॉकडाऊनमुळे परिस्थिती नियंत्रणामध्ये राहण्यास फायदा झाला अन्यथा परिस्थिती भयंकर झाली असती असे ते म्हणाले. घरात रहा सुरक्षित राहा सोबतच सावध राहा, हात सतत धुवत राहा, तोंडाला शक्यतो हात लावू नका अशी काळजी देखील त्यांनी घेण्यास सांगितली.परदेशातूनही लोक आपण आणत आहोत, मात्र विलगीकरण हे आवश्यक आहे, तुम्हाला काही लक्षणे नसली तरी तुम्ही वाहक होऊ नका असे देखील त्यांनी सांगितले.
स्थानिक लोकांच्या प्रवासाविषयी बोलताना ते म्हणाले की लोकांनी आतापर्यंत सहकार्य केले आहे ते आणखीन थोडे काळ करावे. तुम्ही गावी जाण्याऐवजी धीर धरला तर सर्वांसाठी बरे होईल, काही ग्रीन झोनमध्ये मुंबई-पुण्यातून गेलेले लोक पॉझिटिव्ह आढळले, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचाही तुम्ही विचार करायला हवा. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांकडूनही विचारणा होत आहे, बाहेरच्यांना पाठवलं आम्हाला कधी पाठवणार? पण तुम्ही तर आमचे आहात, तुम्हालाही पोहोचवू, कृपा करुन तुम्ही चालत जाऊ नका असे आव्हान देखील त्यांनी केले.
▫️उद्योगधंद्यांविषयी काय म्हणाले?
• राज्यात आत्तापर्यंत ५०,००० उद्योग सुरू करण्यात आले आहे.
• सुरू झालेल्या या उद्योगांमध्ये पाच लाख कामगार कामावर रुजू झाले आहेत
• नवीन उद्योग धंदे सुरू करण्यासाठी ४० हजार एकर जमीन राखीव ठेवण्यात आली आहे
• राज्यात येणाऱ्या नवीन उद्योगांना अगदी कमी नियमांचे पालन करून उद्योग सुरू करण्यास परवानगी. मात्र कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी.
• रेड झोन मध्ये आणि कंटेनमेंट झोनमध्ये उद्योगधंदे पूर्वीप्रमाणेच बंद राहणार आहेत.
▫️५ लाख स्थलांतरित मजुरांना गावी पोहोचवले
आतापर्यंत राज्य सरकारने पाच लाख स्थलांतरित मजुरांना आपापल्या राज्यात त्यांच्या गावी पोचवले आहे. त्यांच्याकडून तिकिटाचे कोणतेही पैसे घेतले गेलेले नाही. तसेच त्यांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय देखील सरकारने केली आहे. याचबरोबर इथे अजूनही राहत असलेल्या मजुरांसाठी एक वेळचा नाष्टा आणि दोन टाईम जेवण व इतर सुविधा राज्य सरकार पुरवत आहे. मजुरांनी पायी घरी जाण्याचा प्रयत्न करू नये. रोज नवीन अपघात समोर येत आहेत. सरकार संपूर्ण काळजी घेत आहे त्यामुळे मजुरांनी पायी घरी जाण्याचा मार्ग निवडू नये असेदेखील त्यांनी मजुरांना आव्हान केले.
▫️विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही
जून महिन्यामध्ये शाळा आणि महाविद्यालय सुरू होत असतात त्यामुळे त्या दृष्टिकोनातून सरकार पावले उचलत आहे. पावसाळा सुरू होण्याच्या आत आपल्याला या संकटातून मुक्त होणे गरजेचे आहे. शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकडे देखील सरकारचे लक्ष आहे. शक्य झाल्यास सरकार जून महिन्यांमध्ये शाळा व कॉलेज सुरू करण्याचा विचार करू शकते. मात्र ३१ मे पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी