नाथषष्ठी यात्रेसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार : पालकमंत्री संदीपान भुमरे

छत्रपती संभाजीनगर, २ मार्च २०२३ : पैठण येथे नाथषष्ठी यात्रोत्सवात राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने पैठण येथे दाखल होत असतात. यंदा या यात्रेसाठी १५ लाखांपेक्षा जास्त भाविक व वारकरी पैठणनगरीत दाखल होणार आहे. इतक्या मोठा संख्येने सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना यात्रा काळात प्रशासनाने बससेवा, आरोग्य, पिण्याचे पाणी, वीज या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे पालकमंत्री भुमरे नाथषष्ठी यात्रोत्सवानिमित्त आढावा बैठकीत म्हणाले.

तसेच पंढरपूरप्रमाणे संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी सोहळ्याच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देणार असल्याचेही भुमरे यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत एसटी वाहतूक सुविधा, आरोग्य विभाग पूर्वतयारी, नाथषष्ठी काळात जायकवाडी धरणातून गोदापात्रात सोडण्यात येणारे पाणी, गोदावरी वाळवंटातील साफसफाई, बीएसएनएल दूरसंचार सेवा, नगरपालिका पाणीपुरवठा व्यवस्था, नाथ मंदिर ट्रस्टकडून भाविकांसाठी सोयीसुविधा, पोलिस बंदोबस्त, जीवन प्राधिकरण यांच्याकडून करण्यात येणारी कामे, पैठण शहरात विद्युतीकरण, सजावट व्यवस्था आदी भौतिक सोयीसुविधा देण्याबाबत आढावा घेण्यात आला. नाथषष्ठी यात्रेसाठी पूर्वतयारीची करण्यात येणारी सर्व कामे प्रगतिपथावर असल्याचे यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी या आढावा बैठकीत सांगितले.

या बैठकीला अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, उपविभागीय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहूल, प्रभारी पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी, तहसीलदार शंकर लाड, नाथमंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, विश्वस्त विठ्ठल महाराज चनघटे आदी उपस्थित होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा