शेअर बाजारासाठी आजचा दिवस महत्त्वाचा, जीडीपी आकडेवारीचा होणार परिणाम

मुंबई, १ डिसेंबर २०२०: गुरु नानक जयंतीनिमित्त सोमवारी शेअर बाजार बंद होता. सलग तीन दिवस बंद राहिल्यानंतर मंगळवारी शेअर बाजार खुले होईल. तसे म्हटले तर नोव्हेंबर हा शेअर बाजारासाठी आणि गुंतवणूकदारांसाठी उत्कृष्ट होता. आता प्रत्येकाची नजर आज म्हणजेच एक डिसेंबर रोजी सुरु होणाऱ्या बाजाराकडे लागली आहे.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदारांना देखील शेअरबाजार आगामी काळात सकारात्मक असेल अशी अपेक्षा आहे. तसेच त्यांचं असं देखील म्हणणं आहे की, गेल्या काही काळापासून शेअरबाजारात होत असलेली सतत तेजी पाहता आता गुंतवणूकदार आपला प्रॉफिट बुक देखील करतील, म्हणजेच काही प्रमाणात शेअरची विक्री दिसून येईल. नवीन अमेरिकन सरकारने केलेल्या प्रोत्साहन उपायांच्या घोषणेशी संबंधित घडामोडी जागतिक स्तरावर गुंतवणूकदार पहात आहेत. या आठवड्यात बऱ्याच देशांमधील शेअर मार्केट सुट्टीच्या मूडमध्ये असण्याची शक्यता आहे.

प्रथम, शेअर बाजार जीडीपीच्या आकडेवारीवर प्रतिक्रिया देईल. शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर जीडीपीचे आकडे जाहीर करण्यात आले. डेटाने सर्व अंदाज चुकीचे असल्याचे सिद्ध केले. जीडीपी १० टक्क्यांपेक्षा कमी घसरेल असा अंदाज सर्व आर्थिक संस्थांकडून वर्तविला जात होता, परंतु तो केवळ ७.५% घसरला. यासह, ग्राहकांच्या चांगल्या मागणीसह अर्थव्यवस्थेची परिस्थिती वेगाने सुधारेल अशी आशा आहे.

आरबीआय बैठक

रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक या आठवड्यात होणार आहे. किरकोळ महागाईच्या दबावाखाली, ६ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचलेल्या किरकोळ महागाईच्या दबावाखाली रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा पॉलिसीचे दर कायम ठेवू शकते. २ ते ४ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या आर्थिक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत सलग तिसर्‍या वेळी रेपो दरात बदल होणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

वाहन विक्रीचे आकडे

या व्यतिरिक्त ऑटो कंपन्यांच्या नोव्हेंबरच्या विक्री आकडेवारीवरही सर्वांचे लक्ष लागून आहे. ऑक्टोबर हा वाहन कंपन्यांसाठी चांगला महिना होता. आता अशी अपेक्षा आहे की नोव्हेंबरमध्ये विक्रीचे आकडे अधिक चांगले येऊ शकतात. कारण सणाच्या हंगामात अनेक प्रकारच्या ऑफर देण्यात आल्या आहेत.

परदेशी गुंतवणूकदारांकडे नजर

इतकेच नाही तर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनीही नोव्हेंबरमध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये बरीच गुंतवणूक केली. आता डिसेंबरच्या पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांचा कल, कच्च्या तेलाची किंमत, रुपयाच्या हालचालीचा परिणामदेखील शेअर बाजारावर दिसून येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा