मराठा आंदोलनाचा आज १० वा दिवस

16

जालना, ७ सप्टेंबर २०२३ : मराठा आरक्षणासाठी गेल्या ९ दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील उपोषण करत असून मराठा समाज आंदोलन करत आहे. जालन्यात झालेल्या लाठीचार्जनंतर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार मराठा समाजाकडून करण्यात आला होता. सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा करणारा अध्यादेश राज्य सरकारने काढावा, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आहे. बुधवारी राज्य सरकारकडून यासंदर्भात काही निर्णय घेण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेतलं जाणार का? याची चर्चा चालू होती. मात्र, आंदोलन चालूच राहणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे.

सरकारच्या निर्णयाचे स्वागत मात्र, जो पर्यंत सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षणासाठी जीआर काढण्याची तयारी करण्यात आली असून यामध्ये ज्यांच्याकडे कुणबी समाजाची वंशावळ आहे, त्यांना आरक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे. मात्र, या नंतरही आमच्याकडे कुणबी समाजाची वंशावळ नसल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे आम्हाला ही अट मान्य नसल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

बीड बंद जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देत, बीड जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने, आज सकाळी १० ते १२ या वेळेत शहरात चार तर, जिल्ह्यातील १७ ठिकाणी चक्का जाम आंदोलन सुरु केले आहे. तसेच सांगलीत आज भव्य मोर्चासह सांगली जिल्हा बंदचे आवाहन मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच विविध गांवामध्येही निदर्शने करण्यात येणार आहे. याचा परिणाम एसटी महामंडळाच्या वाहतूकीवर देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री व सरकारनं काढलेला अध्यादेश, मराठा समाज त्याचं स्वागत करतो. पण ज्यांच्या वंशावळीत नोंद असेल, त्यांना प्रमाणपत्र दिलं जाईल असं म्हटलं. पण आमच्या कुणाकडेच वंशावळीचे दस्तऐवज नाहीत. त्यामुळे आम्हाला त्या निर्णयाचा एक टक्काही फायदा होणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगेंनी मांडली आहे. दुसरा मुद्दा, वंशावळीचे पुरावे असतील, तर आम्ही कार्यालयातून स्वत: त्याचे प्रमाणपत्र काढू शकतो. त्याला अध्यादेशाची गरज नाही. पण धाडस दाखवावं लागतं. तुम्ही किमान या कामाला सुरुवात तरी केली, यासाठी मी सरकारचं स्वागत करतो. पण झालेल्या निर्णयाचा आम्हाला काडीमात्र उपयोग नाही. निर्णय चांगलाय, आम्ही मान्यही केला. पण त्यात थोडी सुधारणा करा. जिथे वंशावळीचा शब्द आहे, त्या ठिकाणी सुधारणा करावी. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी असं मनोज जरांगे यांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे