पुणे २९ जुलै २०२२ : जंगल का शेर म्हणून प्रसिद्ध असलेला महाकाय प्राणी म्हणजे वाघ. २९ जुलै हा आतंरराष्ट्रीय व्याघ्र दिवस म्हणून मानला जातो. वास्तविक वाघाची शिकार करणे हा अपराध मानला जातो. पण आंतराराष्ट्रीय माफियांनी भारतीय वाघांना लक्ष्य करुन त्यांची शिकार करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून वाघांच् संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने इ.स. २०१० पासून जगभरात २९ जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून पाळला जातो.
ब्रिटीश सर्वात प्रथम भारतात बंगालमध्येच स्थायिक झाल्याने, त्यांनी भारतीय वाघाचे बंगाली वाघ असेच नामकरण केले. भारतीय उपजात ही भारत, नेपाळ, भूतान, बांग्लादेश व ब्रम्हदेशात आढळते. भारतातील विविध प्रकारच्या जंगलात त्याचे अस्तित्व आहे.
राज्यात २०१४ साली १९० वाघ होते ते वाढून आता २०१९ मध्ये ३१२ इतके झाले असून ही वाढ अंदाजे ६५ टक्के आहे. स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी जे प्रयत्न केले त्याचे हे यश असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
राज्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव नागझिरा आणि सह्याद्री, ताडोबा-अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. या सहा व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्रात स्थानिकांच्या सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याला वन विभागाने प्राधान्य दिले आहे. यासाठी विविध योजना राबवल्या जातात. व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांमधील स्थानिकांचे वनावरचे अवलंबित्व कमी व्हावे, तसेच मानव वन्यजीव संघर्ष कमी व्हावा या उद्देशाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना राबविली जात आहे. योजनेमध्ये समाविष्ट गावांमध्ये जन, जल, जमीन आणि जंगल याची उत्पादन क्षमता वाढवताना मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्यात येतात. यामध्ये स्थानिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतांना पर्यायी रोजगार संधी विकसित करून दिल्या जात आहेत. प्रकल्प सुरु होण्याच्या आधी सरिस्का जातीचे वाघ भारतातून नष्ट झाले आहेत.
सध्या देशात मध्यप्रदेशात वाघांची संख्या ३०८ वरून ५२६ इतकी असून मध्यप्रदेश प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर कर्नाटक राज्यातील वाघांची संख्या ४०६ वरुन ५२४ इतकी असून कर्नाटक राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. व्याघ्रसंवर्धनात तिसरा क्रमांक उत्तराखंड राज्याने पटकावला असून येथील वाघांची संख्या ३४० वरून ४४२ इतकी झाली आहे. महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असून राज्यातील वाघांची संख्या १९० वरून ३१२ इतकी झाली आहे. पाचव्या स्थानावर तामिळनाडू राज्य असून येथील वाघांची संख्या २२९ वरून २६४ झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्याघ्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जगातील वाघ ही महाकाय जात नष्ट न होता, त्यांची संख्या वाढावी, हेच या दिनाचे मुख्य उद्दीष्ट मानावे लागेल.
न्युज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस