नवी दिल्ली, दि. ३० मे २०२०: गेल्या २४ तासात कोविड-१९ चे एकूण ११,२६४ रुग्ण बरे झाले असून आत्तापर्यंत प्रति दिन बरे होणाऱ्यांच्या संख्येतील हा उच्चांक आहे. त्यामुळे कोविड-१९ चे आत्तापर्यंत ८२,३५९ रुग्ण बरे झाले आहेत. याचा परिणाम म्हणून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण २४ तासात ४.५१% ने वाढून ४७.४०% वर पोहोचले आहे. आधीच्या दिवशी ते ४२.८९% होते.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे २९ मे रोजी असलेली सक्रीय रुग्णांची संख्या ८९,९८७ वरून कमी होऊन सध्या ८६,४२२ झाली आहे. सर्व बाधित रुग्ण सक्रिय वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.
३० मे २०२० रोजीच्या आकडेवारीनुसार रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे गेल्या १४ दिवसातील प्रमाण १३.३ दिवस होते ते गेल्या तीन दिवसात वाढून १५.४ दिवस झाले आहे. मृत्यू दर २.८६% आहे. २९ मे २०२० च्या आकडेवारीनुसार कोविड-१९ चे २.४५% बाधित रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत, ०.४८% रुग्ण व्हेंटिलेटरवर तर १.९६% रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. देशातील चाचणी क्षमता वाढली असून सध्या ४६२ सरकारी तर २०० खाजगी प्रयोगशाळेत नमुना चाचणी केली जात आहे. आत्तापर्यंत या सर्व ठिकाणी मिळून कोविड-१९ च्या ३६,१२,२४२ चाचण्या करण्यात आल्या असून १,२६,८४२ नमुन्यांची चाचणी काल करण्यात आली.
कोविड-१९ च्या व्यवस्थापनासाठी देशातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचा विचार करता आजमितीस ९४२ कोविड समर्पित रुग्णालये असून त्यात १,५८,९०८ अलगीकरण खाटा, २०,६०८ अतिदक्षता खाटा, ६९,३७४ ऑक्सिजन सुविधा असलेल्या खाटा आहेत. २,३८० कोविड समर्पित आरोग्य केंद्रे असून त्यात १,३३,६७८ अलगीकरण खाटा, १०,९१६ अतिदक्षता खाटा आणि ४५,७५० ऑक्सिजन सुविधा असलेल्या खाटा कार्यरत आहेत. देशात कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १०,५४१ विलगीकरण केंद्रे आणि ७,३०४ कोविड सेवा केंद्रे असून तिथे सध्या ६,६४,३३० खाटा उपलब्ध आहेत. केंद्र सरकारने राज्य/ केंद्रशासित प्रदेश/ मध्यवर्ती संस्थांना ११९.८८ लाख एन९५ मास्क आणि ९६.१४ लाख वैयक्तिक संरक्षण उपकरणे (पीपीई) पुरविली आहेत.
कोविड-१९ च्या नवीन जीवनशैलीबरोबर जुळवून घेताना सर्व खबरदारी घेण्याविषयी पुन्हा पुन्हा सांगितले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी शारीरिक अंतर नियमाविषयीच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे; वारंवार हात धुणे आणि श्वसनमार्गाची स्वच्छता राखली पाहिजे; मास्क किंवा फेस कव्हर सार्वजनिक ठिकाणी वापरावे; आणि खोकताना/ शिंकताना शिष्टाचारांचे अनुसरण केले जावे. कोविड -१९ चे व्यवस्थापन केवळ तेव्हाच शक्य आहे जेव्हा प्रत्येकजण व्यवस्थित काळजी घेईल आणि टाळेबंदीच्या काळात शिथिलीकरण गृहीत धरणार नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी