वटपौर्णिमेच्या बंधनातून आजची सावित्री करत आहे वडाची झाडे मुक्त

पुणे, दि. २५ जून २०२० : नुकताच वटपौर्णिमा हा सण साजरा झाला. त्याच दिवशी नेमका जागतिक पर्यावरण दिवस ही साजरा करण्यात आला. परंपरेनुसार अनेक स्त्रियांनी वडाच्या झाडाला फेऱ्या मारून सण साजरा केला. पण पुण्यातील सोशल सायन्स मध्ये मास्टरी केलेल्या श्वेताने पुण्यातील बऱ्याच वडाच्सा झाडांना मुक्त करण्याचा उपक्रम हाती घेऊन तो पूर्ण केला. यावेळी न्यूज अनकट प्रीतिनिधीशी बोलताना ती म्हणाली,
समाजसेवा करणे हा प्रत्येकाचा आवडीचा विषय असतो. परंतू माझ्यासाठी समाज सेवेपेक्षा समाज बदलाचा विषय जास्त महत्वाचा आहे.

तात्पुरती सेवा सगळेच करतात पण एकदा जाऊन सेवा केली की झालं की संपले सगळे हे माझ्या दृष्टीने चुकीचे आहे. कोणत्याही कामात सातत्य हवं. समाजात बदल घडवायचा असेल तर त्या कार्यात अविरत कष्ट घ्यावे लागतात. तेव्हा कुठे बदल होतो आणि मला खरचं समाजात बदल घडवायचा आहे. त्याची सुरुवात स्वतः पासून असावी असे नेहमी वाटतं. ह्याच ध्यासापायी समाज विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि अभ्यासक्रमांचा महत्वाचा भाग म्हणजे क्षेत्रकार्य होय. क्षेत्रकार्य करताना अनेक संस्थांशी संपर्क आला त्यात बाल, महिला, कामगार, प्रशिक्षण कार्यक्रम ह्या सगळ्या गोष्टीत काम करताना नवीन माहिती वेळोवेळी मिळाली. त्यात अंघोळीच्या गोळी या संस्थेशी संपर्क आला.

त्यांच्या अनेक उपक्रमांमधील खिळे मुक्त झाड हा उपक्रम हा अतिशय आवडला आणि त्यांच्या सोबत दर रविवारी सकाळी ८ वाजता जाऊन कोथरुड मधील विविध भागातील झाडांचे खिळे काढू लागलो. सोबत संस्थेचे कार्यकर्ते असायचे ते मार्गदर्शन करायचे. झाडे देखील सजीव असतात हे शाळेतील विज्ञानात आपण शिकलो पण खरंच झाडांजवळ जाऊन अनुभवला का ?

आम्ही काम करायचो तेव्हा खिळा काढताना झाडांमधून रस पाझरायचा आणि तेव्हा सरिता म्हणायची बघ झाड कस रडतंय तेव्हा खरचं झाडे देखील रडतात ह्यावर विश्वास बसला. हा विषय क्षेत्रकार्याचा अभ्यास विषय असल्याने त्यावर थोडं वाचन चालू केलं. वाचन करताना अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या. सहकारी मित्राने आणखी नवीन माहिती दिली की झाडांना खिळे ठोकले, दोरे गुंडाळले, तारा गुंडाळल्या की त्यांचे विघटन झाडामध्ये होत असते. जे आपल्याला दिसत नाही, आणि हे विघटन अर्धवट होते, तारा, खिळे ह्यांना गंज लागतो तो गंज पर्यायाने झाडाला लागतो , दोऱ्यांच ही तसच त्यांचं विघटन व्हायला बराच काळ लागतो.

पावसाळ्यात हे दोरे झाडाला आवळून बसतात त्यामुळे झाडातील ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड ह्यावर परिणाम होतो आणि हळूहळू झाडांची जीव रस निर्माण करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे झाडाचे आयुर्मान देखील कमी होते.

सर्वांना माहीत आहे की एक व्यक्तीला श्वास पुरवण्यासाठी ७ -८ झाडं लागतात.
पण आहेत का भूतलावर एवढी झाडे.
खरतर कृत्रिम प्राणवायू विकत घ्यायला एक दिवसासाठी ७०००-८००० रुपये मोजावे लागतात.पण तोच प्राणवायू झाडे आपल्याला विनामूल्य देतात.

खूप विचार केल्या नंतर हेच कळलं की आपण झाडांना मारून पर्यायी आपलं आयुष्य कमी करतोय.आणि तेव्हा ठरवला की आपण पण हे काम कायम करायचं. क्षेत्रकार्य जरी ३ महिने करायचं असले तरी मी हे काम माझं पूर्ण आयुष्यभर करायचं ठरवलं आहे. वर्षातून एकदा वृक्षारोपण करतो पण रोज झाडं लावणं ते शक्य नाही पण रोज एका झाडाचे खिळे काढले तर ते झाडाचे आयुष्य तरी वाढेल. आणि त्यात आपल्या परंपरेमुळे वडाच्या झाडाला वर्षातून एकदा दोरे गुंडाळून गुंडाळून गुदमरायला लावतात आणि खरच नाही बघवत मला ते दृश्य
एखाद्या माणसाला करकचून बांधून ठेवला तर त्याचा पण जीव जाईल हो, फरक फक्त हाच की ते झाड आहे पण त्याला देखील जीव आहे ना,आहे ना? जंगल जळण्याच्या घटना पाहिल्या, रादर अजूनही पाहतोय, मोठ्या मोठ्या गप्पा ऐकतो आपण काय तर झाडे वाचवा ,झाडे जगवा.हे फक्त बोलण्यापूरतेच का?
वडाचे झाड हे २४ तास ऑक्सिजन पुरवते.
त्याचे आयुष्य ३५०+ च्या अधिक असते .पण ह्या दोरे गुंडळण्यामुळे ते कमी होत चालले आहे.

म्हणून स्वतः पासून हे काम सुरू केलय. संस्थेचे कार्यकर्ते आणि अनेक मित्र मैत्रिणींना पण सोबत घेत झाडांचे खिळे काढतो. गाडीच्या डिग्गी मध्ये देखील कटर, सुरी, पक्कड ह्या गोष्टी ठेवल्यात दिसला झाडाला दोरे किंवा खिळे की काढायचे. जास्त वेळ नाही लागत ह्या कामाला येता जाता दोन मिनिट खूप होतात हो. खूप समाधान मिळतं ह्या कामात.

सध्याचं निसर्गाचं प्रलयकारी रूप आपण सगळेच पाहत आहोत ह्यातून आपण अनेक गोष्टी शिकण्यासारख्या समोर आल्यात ते समजून घ्या आणि निसर्ग वाचवा, कारण तो आहे तर आपण आहोत.आणि झाडांप्रती, निसर्गाप्रती कृतज्ञता दाखवायची ही संधी आहे.

प्रत्येकाने हेच आवाहन आहे की रस्त्याच्या कडेला कोणत्याही झाडाला गुंडाळलेले दोरे किंवा खिळे ठोकलेले आढळले तर जाऊन ते काढा आणि झाडाला मुक्त करा. ह्यामध्ये देखील आपलाच स्वार्थ आहे , आपल्याला जास्त ऑक्सजनचा पुरवठा होईल. निदान हा विचार करून तरी दोरे सोडा. बाकी २०२० मधील निसर्गाचा कहर तर ह्याची देही ह्याची डोळा पाहतोच आहोत.त्यामुळे जागे व्हा आणि सकारात्मकतेने निसर्गाकडे बघा.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी अयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा