सिन्नर, २३ डिसेंबर २०२२ : मागील काही दिवसांमध्ये टोमॅटोचे दर प्रमाणापेक्षा अधिक घसरल्याने पिकविलेला माल अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्याची परिस्थिती उत्पादक शेतकरी यांच्यावर आली आहे. बाजार समितीत टोमॅटोला प्रतिकिलो दोन ते चार रुपयांचा दर मिळत असल्याने उत्पादन खर्च निघणेही मुश्कील झाले असून, बळीराजा हतबल झाला आहे.
मागील काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव सातत्याने खाली घसरत असल्याने उत्पादकांना सर्वाधिक फटका बसला आहे. टोमॅटो हे चांगले उत्पादन देणारे पीक असल्याने याची तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. मागील महिन्यात टोमॅटोला चांगला भावही मिळाला होता; मात्र मागील काही दिवसांत टोमॅटोचे दर चांगलेच पडले आहेत. यातच सिन्नर बाजार समितीत प्रतिकिलो ३ ते सरासरी ३.५० रुपयांचा भाव टोमॅटोला मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातून; तसेच जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या अनेक टोमॅटो उत्पादकांचा वाहतूक खर्चही निघत नसल्याने रिकाम्या हाताने घरी परतावे लागत आहे. यापूर्वी अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते आणि आता भाजीपाला व पिकांचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
सोमवारी येथील बाजार समितीत लिलावात टोमॅटोला प्रतिकिलो दोन ते तीन रुपयांचा भाव मिळाला. टोमॅटोला प्रतिकिलो सरासरी २.७५ पैसे म्हणजे, क्विंटलला २७५ रुपयांचा भाव मिळाला. तर किमान तीन ते साडेतीन रुपये किलो दराने म्हणजेच, तीनशे रुपये क्विंटल दराने अडत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी केला.
”व्यापारी उत्पादकांकडून प्रतिकिलो ३ रुपयांनी घेतलेला टोमॅटो भाजी मंडईत १० ते १२ रुपये किलो दराने विक्री करतात. त्यामुळे ही दरी कमी करीत शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळायला हवा. शेतकरी आर्थिक तोट्यात असताना व्यापारी मात्र पाचपट नफा कमवीत आहे.”
- प्रफुल्ल खंडेराय, शेतकरी
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील