पर्यटन ठप्प! श्रीलंका आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर, ३ महिने पुरेल एवढाच परदेशी चलनसाठा

पुणे, १५ जुलै २०२१: श्रीलंका आधीपासूनच आर्थिक आघाडीवर अडचणीत सापडला होता. परंतु कोरोना महामारीचा पर्यटन उद्योगावर परिणाम झाल्यामुळे ही समस्या आणखी वाढली. परकीय चलन उत्पन्नाचा पर्यटन हा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे. श्रीलंकेतील पर्यटन क्षेत्रात सामान्यत: ३० लाखांपेक्षा जास्त लोकांना उत्पन्न मिळते आणि जीडीपी मधे याचा वाटा ५ टक्के आहे.

खरं तर, श्रीलंकेने आपल्या परकीय चलनामध्ये घट झाल्यामुळे कृषी रसायने, कार आणि मुख्य मासाल्यांपैकी हळदीची आयात कमी केलीय. पीटीआयच्या वृत्तानुसार, एकीकडे श्रीलंका कोरोना च्या संकटातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे देशावर असलेल्या मोठ्या कर्जाची परतफेड करण्यासाठी संघर्ष करत आहे.

व्यापारातील तूट कमी करण्यासाठी शेजारच्या देशाने टूथब्रश, स्ट्रॉबेरी, व्हिनेगर, वेट वाईप आणि साखर यासह शेकडो आयातित वस्तूंवर बंदी घातली आहे किंवा विशेष परवाना देण्याच्या आवश्यकतेच्या अधीन आहेत. परदेशी वस्तूंवर बंदी आणल्यानंतर श्रीलंकेतील अनेक वस्तूंच्या किंमती जोरात वाढल्या आहेत. त्याचबरोबर या दीर्घकाळ चाललेल्या संकटामुळे काही भागात निषेध सुरू झाला आहे.

सध्या श्रीलंकेचा परकीय चलन साठा फक्त तीन महिन्यांची आयात करण्यासाठी पुरेल एवढा आहे. मोठ्या प्रमाणात परकीय कर्जाची परतफेड प्रलंबित आहे, यामुळे श्रीलंकेच्या आर्थिक प्रणालीवर परिणाम झाला आहे. श्रीलंकेचे पेट्रोलियम मंत्री उदय गॅम्पीला यांनी अलीकडेच म्हटले आहे की तेलाच्या आयातीसाठी देशाकडे पैसे कमी आहेत. पेमेंट शिल्लक ठेवण्यासाठी सरकारने अमेरिकन डॉलरचे व्यवहार मर्यादित केले आहेत.

पॉईंट पेड्रो इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट या आर्थिक संशोधन गटाचे प्रमुख मुत्तुकृष्ण सर्वनाथन म्हणाले की, अर्थव्यवस्था अत्यंत वाईट अवस्थेत आहे, त्याबद्दल काही शंका नाही. फिच रेटिंग्जने श्रीलंकेला सीसीसी श्रेणी मध्ये डाउनग्रेड केले आहे. यामुळे डिफॉल्ट ची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात म्हटले आहे की, पुढील पाच वर्षांत देशातील परकीय कर्जाचे दायित्व वाढून २९ अब्ज डॉलर्सवर जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा