हिंदी चित्रपटसृष्टीतील ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचं निधन

मुंबई, ७ जुलै २०२१: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार दिलीप कुमार यांचं निधन झालंय. दिलीपकुमार यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. दिलीपकुमार बर्‍याच दिवसांपासून आजारी होते, त्यांना मुंबईतील रुग्णालयात बर्‍याच वेळा दाखल करण्यात आलं होतं.

आज बुधवारी बॉलिवूडच्या ट्रेजडी किंग ने अखेरचा श्वास घेतला. दिलीपकुमार यांच्या निधनामुळं बॉलिवूड आणि देशात अनेक चाहत्यांना दुःख झालं असून अनेक दिग्गज त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. दिलीपकुमार यांनी बुधवारी सकाळी ७.३० वाजता मुंबईतील खार हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दिलीपकुमार यांच्यावर उपचार करत असलेल्या रुग्णालयाचे डॉक्टर पारकर यांनी या वृत्ताची पुष्टी केली.

गेल्या एका महिन्यात दिलीप कुमार यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ५ जुलै रोजी दिलीप कुमार यांच्या ट्विटर हँडलवरून त्यांच्या प्रकृतीविषयी अद्ययावत करण्यात आलं. दिलीपकुमार यांची पत्नी सायरा बानो यांनी दिलेल्या निवेदनात असं म्हटलं होतं की, दिलीप कुमार यांची प्रकृती सुधारत आहे. ते अजूनही रुग्णालयात आहे, त्यांना तुमच्या सदिच्छांची गरज आहे. पण या हेल्थ अपडेटनंतर दोन दिवसांनी दिलीप कुमार यांनी निरोप घेतला.

पेशावरचा युसुफ जो बनला बॉलीवूडचा ट्रॅजेडी किंग

११ डिसेंबर १९२२ रोजी ब्रिटीश भारतातील पेशावर (आता पाकिस्तानात) येथे जन्मलेल्या दिलीप कुमार यांचं खरं नाव मोहम्मद युसूफ खान होतं. युसूफ खाननं नाशिकमध्ये शिक्षण घेतलं, राज कपूर हे बालपणात त्यांचे मित्र झाले. जणू तिथूनच दिलीप कुमार यांचा प्रवास बॉलिवूडमध्ये सुरू झाला. वयाच्या २२ व्या वर्षी दिलीप कुमार यांचा पहिला चित्रपट आला. १९४४ मध्ये त्यांनी ‘ज्वार भाटा’ चित्रपटात काम केलं, परंतु त्यांचा हा चित्रपट जास्त चर्चेत राहिला नाही.

दिलीप कुमार यांनी करीयरमध्ये जवळपास पाच दशकांदरम्यान सुमारे ६० चित्रपट केले. दिलीपकुमार यांनी आपल्या कारकिर्दीतील बर्‍याच चित्रपटांना नाकारलं होतं, कारण दिलीप कुमार यांचं असं म्हणणं होतं की चित्रपट कमी असले तरी चालतील पण ते दर्जेदार असावेत. पण असं असलं तरीही त्यांना त्या गोष्टीची खंत नक्कीच होती की, त्यांना ‘प्यासा’ आणि ‘दिवार’ या चित्रपटांमध्ये काम करता आलं नाही.

सायरा बानो यांनी निभावली शेवट पर्यंत साथ

दिलीपकुमार यांनी सायरा बानोशी लग्न केलं होतं, ज्या सन १९६६ मध्ये अभिनेत्री देखील होत्या. जेव्हा दोघांचं लग्न झालं तेव्हा सायराबानू या दिलीप कुमार यांच्या पेक्षा २२ वर्षांनी लहान होत्या. दिलीप कुमार यांनी अस्मा साहिबाशी देखील लग्न केलं होतं, परंतु हे लग्न फक्त १९८३ पर्यंत टिकलं. पण दिलीपकुमार यांची सायरा बानोशी जोडी शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा