नाशिक, दि. ९ मे २०२०: महाराष्ट्र कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. राज्यातील मुंबई आणि पुणे ही कोरोनाची हॉटस्पॉट बनली आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात राज्यात कोरोनामुळे ५ पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यात आज नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल साहेबराव झिपरू खरे यांचं कोरोना विरुद्ध लढताना दुःखद निधन झालं.
साहेबराव झिपरू खरे हे ५१ वर्षाचे होते. ते नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. पोलीस महासंचालक व महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अधिकारी-कर्मचारी २४ तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या ६२ पोलीस अधिकारी आणि ४९५ पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. मुंबई ३, पुणे १, सोलापूर शहर १ अशा ५ पोलीस वीरांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे त्यात आज आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याच्या मृत्यूची भर पडली आहे. त्यामुळे राज्यात एकूण ६ पोलिस कर्मचाऱ्यांचा या संकटाशी मुकाबला करताना मृत्यू झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी